सोलापूर : भारताच्या त्र्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते पोलिस मुख्यालयातील शासकीय मैदानावर मैदानावर शासकीय ध्वजारोहण संपन्न झाले. पालकमंत्री भरणे यांचे नऊ वाजून पाच मिनिटांनी मुख्यालयाच्या मैदानावर आगमन झाले, त्यानंतर नऊ वाजून दहा मिनिटांनी पालकमंत्री भरणे यांनी उपस्थितांसमोर संविधान प्रास्ताविकेचे वाचन केले यानंतर पालकमंत्र्यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण होऊन तिरंग्याला मानवंदना देण्यात आली….
उपस्थितांना संबोधित करताना पालकमंत्री भरणे म्हणाले मागील दोन वर्षापासून जगावर कोरोनाचे संकट आहे मात्र सोलापूरच्या प्रशासनाने या दोन्ही लाटेला यशस्वीपणे तोंड दिले आहे. दुसऱ्या लाटेमध्ये 23 मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज होती. सध्या तिपटीने ऑक्सिजन मुबलक असून जिल्हा ऑक्सिजनबाबत स्वयंपूर्ण झाला हे अभिमानाची बाब आहे मात्र अद्यापि शहर जिल्ह्यातील पाच लाख नागरिकांनी लस घेतली नाही. यामध्ये 18 ते 45 वयोगटातील नागरीकांचा सर्वाधिक समावेश आहे. या युवकांनी लसीकरण करून जिल्हा बसवंत करावा आणि प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.
सोलापूर जिल्हा परिषदेचे विशेष कौतुक करताना मागील वर्षभरात जिल्हा परिषदेने नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले, माझे गाव कोरूना मुक्तगाव या अभियानाची दखल राज्य सरकारने घेतली. माझे बालक माझी जबाबदारी हा उपक्रम राबवताना जिल्ह्यातील नऊ लाख बालकांची आरोग्य तपासणी करून त्यांना सुरक्षित केले, स्वच्छ व सुंदर शाळा हे उपक्रम राबवत तब्बल नऊ कोटी लोकसहभागातून शाळा स्वच्छ व सुंदर केल्या, आता तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मी सुरक्षित, माझे गाव सुरक्षित हे अभियान सुरू केले आहे.
महाराष्ट्र राज्य कृषी क्षेत्रात अग्रेसर रहावे म्हणून ऊर्जा विभागाने राज्यातील प्रत्येक कृषीपंप वीज ग्राहकाला त्याच्या मागणीप्रमाणे वीज जोडणीचा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी नविन कृषीपंप वीज जोडणी धोरण 2020 जाहीर केलेले आहे. यानुसार कृषीपंपाच्या वीज बिलात सवलत देण्यात येत असून, थकबाकीच्या 50 टक्के रक्कम भरल्यास वीज बील कोरे करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सोलापूर महानगरपालिकेला नागरिकांना पायाभूत सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी 28 कोटी तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत 33 कोटीचा निधी मंजूर केला आहे. जिल्ह्याच्या इतर नागरी भागासाठीही त्यांच्या मागणीनुसार निधी मंजूर करून नागरी भागाच्या विकासाला चालना देण्यात येत आहे. यावर्षी वन विभाग शहरासह पालखी तळाजवळ मियावाकी पद्धतीने रोपवन लागवड करणार आहे. सिद्धेश्वर वनविहार येथे प्रथमच वन्यजीवांसाठी ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर उभारले जात आहे. 400 हेक्टर क्षेत्रावर वृक्षलागवड केली जाणार असून 34 वे राज्यस्तरीय पक्षीमित्र संमेलन सोलापुरात पार पडले, असे श्री भरणे यांनी सांगितले.
ग्रामीण पोलीस दलाने राबविलेल्या हातभट्टी मुक्त जिल्हा करण्यासाठीच्या मिशन परिवर्तनचे पालकमंत्र्यांनी विशेष कौतुक केले, महापालिकेने राबविलेल्या माझी वसुंधरा अभियानाने अतिशय चांगले काम केले, स्वच्छता मोहीम, प्लास्टिक संकलन, सायकल रॅली, वृक्षारोपण, शालेय स्पर्धा असे सुमारे 400 उपक्रम राबविले.
प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस आयुक्त हरीश बैजल, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, सहाय्यक जिल्हाधिकारी मनीषा आव्हाळे, राज्य राखीव पोलीस दलाचे समादेशक विजयकुमार चव्हाण यांच्यासह जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासन जिल्हा परिषद प्रशासनातील अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


















