सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील राजकीय लक्ष लागून राहिलेल्या श्री सिद्धेश्वर मल्टीस्टेट साखर कारखान्याच्या निवडणुकीचा अर्ज माघारी घेण्याचा शुक्रवारी शेवटचा दिवस होता. कारखान्याच्या निवडणुकीसाठी १६० जणाचे १८८ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते या अर्जाची छाननी 3 डिसेंबर रोजी कारखाना जवळील काडादी सभागृहात झाली. छाननी मध्ये 43 अर्ज बाद झाले त्यामुळे 117 अर्ज शिल्लक आहेत.
शुक्रवारी सकाळपासून अध्यक्ष धर्मराज काडादी यांच्या गंगा निवासस्थानी माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे माजी आमदार दिलीप माने माजी आमदार रतिकांत पाटील माजी आमदार सिद्रामप्पा पाटील राजशेखर शिवदारे, सुरेश हसापुरे, बाळासाहेब शेळके,मल्लिकार्जुन पाटील, श्रीशैल नरोळे, अप्पासाहेब पाटील, संजीव पाटील, बसवराज बगले,शिवसिद्ध बुळळा, हरीश पाटील, भिमाशंकर जमादार, सिद्धाराम चाकोते, कल्याणराव पाटील, दीपक आलूरे, सिद्राम वाकसे, अण्णाराव याबाजी यांच्यासह उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट तालुक्यातील नेते, कार्यकर्ते, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
धर्मराज काडादी यांची इकडून तिकडे पळापळ सुरू होती. म्हेत्रे-हसापुरे-शेळके-शिवदारे हे आत बसून सूत्र हलवत होते. सुरेश हसापुरे, अशोक डंगापुरे, उदय पाटील या तिघांनी माघार घेतल्याने पुष्कराज काडादी बिनविरोध झाले.
सिद्रामप्पा पाटील ‘रॉक’भूमीकेत दिसले, त्यांनी फोन करून आपल्या भागातील उमेदवारांना भरलेला फॉर्म काड रे, आम्हाला काडादी समोर तोंडघशी पाडू नको..या शब्दात झापले, बैठकीत त्यांनी शिवसिद्ध बुळळा यांच्यावर टीका केली होती, मात्र शुक्रवारी बुळळा हे सिद्रामप्पा यांच्या पुढे पुढे करताना दिसले.सिद्रामप्पा अब्दुलपुरकर यांनी ही माघार घेतल्याची माहिती मिळाली. कुणा कुणाला संचालक म्हणून घ्यायचे यासाठी सर्वच नेत्याचा गंगा निवासस्थानी ठाण मांडलेला होता.
कारखाना निवडणूक बिनविरोध करण्यात आणि सर्व नेत्यांना एकत्र आणण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोठ्या ‘साहेबांनी’ लक्ष घातल्याची चर्चा ऐकण्यास मिळाली.


















