सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष बळीराम काका साठे यांनी बुधवारी तडकाफडकी आपल्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर राजीनामा दिल्याने राजकीय खळबळजनक उडवून दिली. आता काका नंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्ह्याची जबाबदारी कुणाच्या खांद्यावर येणार याची चर्चा सुरू झाली. माळशिरसचे उत्तम जानकर, उमेश पाटील, माजी आमदार राजन पाटील की पुन्हा दिपकआबा साळुंखे यांची नावे पुढे आली.
दरम्यान काका साठे यांनी राजीनामा दिल्याची माहिती समोर येताच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्वरित गुरुवारी काका साठे यांना मुंबईला बोलावले, यावेळी काका साठे यांच्या सोबत मोहोळचे आमदार यशवंत माने, महेश कोठे, दिलीप कोल्हे, बिपीन करजोळे, महेश माने, जयदीप साठे, मनोज साठे, बसवराज बगले ही समर्थक मंडळी सोबत होती.
यावेळी उपस्थित नेत्यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांसमोर जिल्ह्यात आणि शहरात राष्ट्रवादी काँग्रेसला चांगले वातावरण असून असे अचानक राजीनामा दिल्याने पक्षीय वातावरण बिघडेल, आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक होई पर्यंत काका हेच जिल्ह्याचे अध्यक्ष राहावे अशी मागणी केली. काका साठे यांच्याही अडचणी ऐकूण घेण्यात आल्या.
काकांची मानसिकता एकूणच काम करत असताना होत असलेला त्रास, वयाची अडचण पाहता राजीनामा देण्यावर ठाम असल्याचे ही सांगण्यात आले. सोलापूर शहर व जिल्ह्यातून आलेल्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर जयंत पाटील यांनी काका साठे यांचा निर्णय केवळ शरद पवार हेच घेतील त्यांची भेट घेण्याची सूचना पाटील यांनी काका यांना केली, त्यानुसार सर्व शिष्टमंडळ मुंबईत पवारांची भेट घेण्यासाठी मुक्कामी राहिले असल्याची माहिती मिळाली.

















