सोलापूर महापालिकेचा महापौर आपलाच अशी भाषा आता काँग्रेस सह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते करत आहेत, यावरून महाविकास आघाडीत बिघाडी निश्चित आहे, काँग्रेस पेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद सोलापूरात वाढत चाललेले चित्र दिसत आहे, असे असतानाही काँग्रेस हा पक्ष वाढी पेक्षा जुन्यानाचं सांभाळण्यात व्यस्त आहेत, शहरात तर केवळ आणि केवळ शहर मध्य मतदारसंघावर पूर्ण फोकस दिसून येतोय, शहर उत्तर मध्ये तर काँग्रेसची वाट लागली आहे, तिथे पक्षाला बळ देने गरजेचे असताना जाणीवपूर्वक दुर्लक्ष उत्तर कडे होतानाच चित्र आहे.
शहर दक्षिण भागात ही म्हणावा तितका काँग्रेसचा जोर नाही, केवळ बाबा मिस्त्री यांच्या जोरावर दक्षिण मध्ये पक्षाची ताकद उरल्याचं दिसतंय, सोलापूरच्या काँग्रेसमध्ये सध्या एकाच घरात अनेक पदे आहेत, ज्यांनी पूर्वी मोठं मोठी पदे भोगली त्यांनाच पदे दिली गेली आहेत, चांगले चांगले नेते पक्ष सोडून गेले आहेत, त्यामुळे काँग्रेस बॅकफूटवर पहायला मिळतो, असे असतान पक्षात नवीन असलेले, आक्रमक, काम करणारे, वेळ देणाऱ्यांना नव्याने पदे देने अपेक्षित आहे मात्र तसे होताना दिसत नाही, चाललंय काय?असा प्रश्न राजकिय वर्तुळात ऐकण्यास मिळतो,
पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या जिल्हा नियोजन समितीमध्ये काँग्रेस कडून चार सदस्य नव्याने स्वीकृत म्हणून घेतले जाणार आहेत, त्यामध्ये 2 शहरातून आणि 2 जिल्ह्यातून कार्यकर्त्यांना संधी मिळणार आहे, मात्र हे चार सदस्य देताना काँग्रेस पक्षाने ज्यांना पदे मिळाली नाहीत याचा विचार केलाच नाही, ज्यांना पदे आहेत, ज्यांनी मोठी पदे भोगलीत अशातच पद दिलं गेलंय त्यामध्ये शहरात महापालिकेचा गटनेता चेतन नरोटे व नगरसेवक प्रवीण निकाळजे यांचा समावेश असल्याचे समोर आलंय तर जिल्ह्यात माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, आणि जे भाजप सोडून नुकतंच काँग्रेस मध्ये आलेले, आमदारकी जिल्हाध्यक्ष पद भोगले माजी आमदार धनाजी साठे या दोघांना डीपीसी मध्ये संधी दिली गेल्याची माहिती समोर आली आहे,
मुळात डीपीसी मध्ये आमदार प्रणिती शिंदे असताना नरोटे आणि निकाळजे काय बोलणार असा प्रश्न असून निकाळजे यांनी तर महापालिकेच्या सभागृहात आजपर्यंत किती प्रश्न मांडले हा संशोधनाचा विषय आहे. शहर मध्यचा विचार करून पद दिले मात्र त्यांच्या विजयात कायमच महत्वाची भूमिका राहिलेल्या मोची समाज किंवा रामवाडी सेटलमेंट परिसरातील एका कार्यकर्त्याला संधी देणे आवश्यक होते, पण त्यांनी तसे केले नाही, मध्य मधील साळी समाजाला संधी मिळायला हवी होती.
सोलापूर शहरात इतर अनेक अभ्यासू कार्यकर्ते आहेत जे शहर उत्तर असेल किंवा शहर दक्षिण त्यांना संधी देणे अपेक्षित होते मात्र दिली गेली नाही, सुदीप चाकोते असतील एन के क्षीरसागर असतील, किंवा दक्षिण भागातील प्रवक्ते हाजीमलंग नदाफ असे अनेक कार्यकर्ते आहेत ज्यांना संधी मिळू शकली असती,
माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे हे तर पालकमंत्री राहिले आहेत, आता जरी आमदार नसले तरी केवळ एका भेटीवर त्यांची कामे होतात हे दिसून आले आहे, मग त्यांनी मोठे मन करून काँग्रेसच्या इतर कार्यकर्त्याला संधी देणे गरजेचे होते, उलट आता त्यांच्यात नेतृत्वाखाली काम करणारे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे यांना ही म्हेत्रे संधी देऊ शकले असते, हसापुरे हे प्रशासनाकडून काम करून घेण्यात माहीर आहेत, नियोजन समिती सभेत ते प्रश्न आक्रमक पणे मांडू शकतात, उलट ग्रामीण भाग मजबूत करण्याची संधी काँग्रेसला आहे. धनाजी साठे हे किती प्रश्न मांडणार आहेत, त्यांच्यापेक्षा इतर युवा कार्यकर्त्याला संधी दिली गेली तर निश्चितच पक्षाला फायदा होणार आहे.