सोलापूर : सध्या संपूर्ण भारतात ‘पुष्पा’ या दक्षिणात्य चित्रपटाची सर्वत्र क्रेझ आहे. या चित्रपटांमधील सामी…,सामी या गाण्याने अक्षरश: सर्वांना वेड लावले आहे. असे असताना सोलापूर जिल्ह्यात सध्या स्वामी हे नाव सर्वत्र गाजताना दिसतय. त्याला कारणही तसचं आहे.
सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या कार्याचं थेट राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी भरभरून कौतुक केले. आपल्या 15 मिनीटाच्या भाषणात तब्बल अकरा ते बारा वेळा त्यांनी दिलीप स्वामी यांचं नाव घेतलं. अजित दादा म्हटलं की,त्या नेत्याचा वेगळा दरारा असून त्यांचा फटकळ आणि सडेतोड स्वभाव हा सर्वश्रुत आहे. ते कधी कुणाला काय बोलून जातील हे सांगता येत नाही
त्यामुळे जिल्हा परिषदेच्या बाबत ते का आज काय बोलतील त्याची उत्सुकता सगळ्या राजकीय, प्रशासकीय आणि माध्यमांना होती. मात्र मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या कार्याचं इतकं कौतुक झालं हे सर्वाना चकित करणारं होतं. अजितदादा उगीच कुणाच्या कौतुक करत नाहीत या कौतुकाला निश्चितच दिलीप स्वामी हे पात्र आहेत.
स्वामींच्या स्वच्छ व सुंदर शाळा अभियानाला स्वर्गीय आर आर आबांची आठवण सांगत त्यांच्या निर्मलग्राम योजनेला जोड दिली हे त्या कार्यक्रमात सर्वात मोठी उपाधी होती. स्वामी यांच्या मागील 14 महिन्याच्या कार्यकाळात दिलीप स्वामी यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर काम करताना तब्बल 10 ते 15 विविध उपक्रम अभियान राबवले आहेत.
त्यातील 2 अभियान राज्य सरकारने स्वीकारले आहेत. यामध्ये माझे गाव कोरोनामुक्त गाव, माझे बालक माझी जबाबदारी, स्वच्छ व सुंदर शाळा, मी सुरक्षित माझे गाव सुरक्षित, जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांसाठी ऑनलाईन सेवा पुस्तिका, एक पद एक वृक्ष, माझे दुकान माझी जबाबदारी, जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मुलींसाठी सायकल बँक, स्वच्छ व सुंदर शाळा या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे स्वच्छ व सुंदर करण्यासाठी जनसंजीवनी योजना राबवत आहेत.
















