सोलापुरातील नागरिकांना कोणत्याही सोशल मीडिया आणि इंटरनेटवर अश्लील चाइल्ड पोर्नोग्राफी सर्च करणे, पाहणे, शेअर करणे कायद्याने गुन्हा असून त्यात पहिल्या दोषसिध्दीस ५ वर्षे कैद व १० लाख रुपये दंड व दुसऱ्या दोषसिध्दीस ७ वर्षे कैद व १० लाख रुपये दंड अशी शिक्षेची तरतूद आहे. सोशल मीडिया आणि इंटरनेटवर सायबर पोलीस ठाण्याची करडी नजर असून कोणीही आक्षेपार्ह पोस्ट शेअर करु नये, असे आवाहन सायबर पोलीस ठाण्याच्यावतीने करण्यात आले आहे.
इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर अश्लील चाइल्ड पोर्नो ग्राफीचा व्हिडिओ अपलोड करणाऱ्या तरुणास सायबर पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अटक केली आहे.
मनीष विजयराज बंकापूर (वय २३, रा. पूर्व मंगळवार पेठ, कोंतम चौक) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
मुंबईच्या महाराष्ट्र सायबर विभागाच्या पोलीस उपमहानिरीक्षकांकडून गोपनीय • सीडीची विविध सॉफ्टवेअरद्वारे पडताळणी करण्याकरिता पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस उपायुक्त बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाणे येथे देण्यात आली होती.
सायबर पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कौशल्य पणाला लावून प्राप्त सीडीमधील अज्ञात आरोपीचा शोध घेण्याकरिता विविध सॉफ्टवेअरद्वारे तांत्रिक माहितीचे विश्लेषण करुन आरोपी बंकापूर याला अटक करण्यात आली. तो इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत होता.
त्याने त्याच्या मोबाईलद्वारे चाइल्ड पोर्नोग्राफी इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर अपलोड केल्याने त्याच्याविरुध्द पोलीस नाईक बाबूराव मंगरुळे यांनी सरकारतर्फे माहिती व तंत्रज्ञान कायदा २००० चे कलम ६७ (ए) प्रमाणे तक्रार नोंदवली. जोडभावीपेठ पोलीस ठाण्यात आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक बजरंग साळुंखे, फौजदार राणा बायस, नागेश होटकर तसेच पोलीस कर्मचारी संतोष येळे, सचिन गायकवाड, मंगरुळे, अमोल कानडे, करण माने, इब्राहिम शेख, वसीम शेख, प्रवीण शेळकंदे, प्रांजली काळे, पूजा कोळेकर आदींनी केली.