सोलापूर : राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे दोन दिवस सोलापूर दौऱ्यावर येऊन गेले त्यांना भेटण्याचा बोलण्याचा अनेक सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सुवर्णयोग जुळून आला सोमवारी सकाळी ते हॉटेल बालाजी सरोवर या ठिकाणी कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला. याच वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी गटनेते किसन जाधव यांनीही पवार यांची भेट घेतली.
यावेळी त्यांच्या जवळ जाऊन कानात काहीतरी सांगितले. त्यानंतर जेव्हा शरद पवार हे हॉटेलमधून बाहेर पडले तेव्हा त्यांच्या वाहनात बसण्याचा योग किसन जाधव यांना आला. हॉटेल बालाजी सरोवर ते सोलापूर विमानतळापर्यंत ते पवार यांच्या गाडीत बसून होते.
यानंतर जाधव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, माझ्या आयुष्यातील आज सर्वात मोठा दिवस होता मी ज्यांना दैवत मानत होतो त्यांच्यासोबत बसून प्रवास करण्याची मला संधी मिळाली. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मी आपली भूमिका सांगितली, तेव्हा साहेबांनी मला त्यांच्या गाडीत बसण्यास सांगितले, बराच वेळ आमच्यात महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा झाली तसेच काही दिवसातच साहेब हे पुन्हा सोलापूर दौऱ्यावर येणार आहेत. आणि त्या दौऱ्यामध्ये अनेक मोठ्या राजकीय नेत्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होईल अशी माहिती जाधव यांनी दिली.



















