सोलापूर : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आषाढी दौरा करून परतले त्यांनी आषाढी वारीपूर्वी दोन दिवस अगोदर पंढरपुरात येऊन आढावा घेतला. तसे तर हे पहिले मुख्यमंत्री असतील की त्यांनी आषाढी एकादशी पूर्वी येऊन आढावा घेतला असेल. मागील पाच दिवसात मुख्यमंत्री सोलापूरला दोन वेळा आले आहेत.
या दोन दिवसात दोन वेळच्या दौऱ्यामध्ये मुख्यमंत्र्यांचा जवळचा कोण? यासाठी सोलापुरातील जिल्हाप्रमुखांमध्ये चढाओढ दिसून आली आहे. 2022 या सालात आषाढी वारीच्या दौऱ्या दरम्यान मुख्यमंत्री सोलापुरात परतताना जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांनी आपल्या कार्यालयाचे जंगी उद्घाटन केले होते. तेव्हापासून काळजे यांची सोलापुरात आणि राजकीय वर्तुळात बरीच क्रेझ वाढली.
या वेळच्या आषाढी वारी वेळी जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी आपल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील कार्यालयाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते केले. बापूंनी जंगी स्वागत करून आपल्या कार्यालयाचे उद्घाटन करून दाखवलं तसे पाहायला गेल्यास हे कार्यालय यापूर्वीच सुरू झालेलं मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कार्यालयात आणून उद्घाटनाची औपचारिकता पूर्ण करत त्यांनी आपलं महत्व वाढवलं. तसेच आता अमोल शिंदे हे मुख्यमंत्र्यांच्या जवळ जाताना दिसत आहेत. प्रत्येक दौऱ्यात ते सोबत असतात नुकतेच त्यांनी सोलापूर विकास मंचला सोबत घेऊन विमान सेवा सुरू करण्यासाठी निवेदन दिले.
हे सर्व पाहून मनीष काळजे गप्प कसे बसणार. त्यांनीही यावेळच्या आषाढी वारीनंतर परत जाताना मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवला. साहेबांनी आपला कार्यकर्ता असल्याने गाडी थांबवून ते गाडीतून उतरले. स्टेजवर गेले. एका काँग्रेसच्या कार्यकर्त्याचा प्रवेश शिवसेनेत करून सपत्नीक सत्कार करून जंगी स्वागत केले. त्याही स्वागताने आषाढी एकादशी दिवशी सर्वांच्या लक्ष वेधून घेतले.
या दोन जिल्हाप्रमुखांमध्ये सध्या चढाओढ सुरू असल्याचे दिसून येते. व्हाट्सअप वर मुख्यमंत्र्यांसोबतचा एखाद्याने फोटो टाकला तर लगेच दुसरे आपला फोटो खाली टाकतात, हे पत्रकारांच्या काही ग्रुप वर सर्रास पाहायला मिळत आहे.

























