सोलापूर, दि. 28 (जि. मा. का.) : सामाजिक न्याय विभागामार्फत सामाजिक न्याय पर्व अभियानांतर्गत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या अध्यक्षतेखाली तृतीयपंथीयांच्या हक्काचे संरक्षण व कल्याण या योजनेंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा व मेळावा आज पार पडला.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीचे औचित्य साधून बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे झालेल्या या मेळाव्यास सहायक आयुक्त, समाज कल्याण नागनाथ चौगुले, तहसीलदार अमर वाकडे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक राजशेखर शिंदे, निरामय आरोग्य धामच्या अध्यक्षा सीमा किणीकर, क्रांती महिला संघाच्या अध्यक्षा रेणुका जाधव, दोस्ताना संघचे अध्यक्ष आयुब शेख, शासकीय निवासी शाळेच्या विशेष अधिकारी सुलोचना सोनवणे तसेच संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर म्हणाले, तृतीयपंथीयांचे पुनर्वसन व्हावे, त्यांनी मुख्य प्रवाहात यावे यासाठी शासन व जिल्हा प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. जिल्ह्यातील सर्व तृतीयपंथीयांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याकरिता जिल्हा प्रशासन विविध उपक्रम राबवित आहे. जिल्ह्यातील तृतीयपंथीयांनी अनभिज्ञ न राहता दोन पावले पुढे येवून सर्व शासकीय योजनांची माहिती घ्यावी व संबंधित योजनांचा लाभ घेण्याकरिता पाठपुरावा करावा. तृतीयपंथीयांनी त्यांच्या अडीअडचणी संबंधित अधिकाऱ्यांना कोणताही संकोच न बाळगता सांगाव्यात. प्रशासन तुमच्या सोबत आहे, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
प्रास्ताविक नागनाथ चौगुले यांनी केले तर प्रा. बालाजी जगताप यांनी सूत्रसंचालन केले.



















