सोलापूर : रविवारी सोलापुरात काँग्रेसचा निर्धार महामेळावा संपन्न झाला. या मेळाव्याला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार भाई जगताप, माजी मंत्री नसीम खान, आमदार प्रणिती शिंदे, माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांच्यासह अनेक प्रमूख नेते उपस्थित होते.
पहिल्या रांगेत प्रमुख नेते बसले होते, एका कोपऱ्यात शहराध्यक्ष चेतन नरोटे व दुसऱ्या कोपऱ्यात जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील बसून होते, कार्यक्रम दरम्यान ज्येष्ठ नेत्या उज्वला शिंदे या खाली रांगेत बसले होते, त्यांना जेव्हा सूत्रसंचालकानी त्यांना स्टेजवर येण्याची विनंती केली मग त्यांना खुर्ची द्यायची कोण असा प्रश्न होता, तेव्हा शिंदे यांच्या शेजारी बसलेले नाना पटोले हे उठले आणि शेजारी बसण्यास विनंती केली, भाई जगताप उठले, सिध्दाराम म्हेत्रे उठले, मोहिते पाटील उठले, अशोक निंबर्गी पण उठले सर्वांनी खुर्ची देण्यास सरसावले, त्याच गोंधळात सर्वांचे दुर्लक्ष झालेले जिल्हाध्यक्ष धवलसिन्ह मोहिते पाटील हे हीच संधी साधून उठून गेले, त्यांना येऊन खुर्चीवर बसा म्हणून प्रकाश यलगुलवार यांनी विनंती केली मात्र ते तसेच बाहेर पडले, त्यांच्या मागोमाग समर्थक कार्यकर्तेही उठून गेले. नंतर धवलसिन्हाच्या जागी मागे बसलेले रामहरी रुपनवर हे बसले.
या कार्यक्रमात सूत्रसंचालन जबाबदारी जिल्हा प्रसिध्दी प्रमुख सातलिंग शटगार यांच्याकडे होते त्यांनीही आपले सूत्रसंचालन सुरू केले होते पण नंतर लगेच त्यांच्या हातून ही माईक काढून घेण्यात आला ते ही हातातील कागद नरोटे यांच्या हातात देऊन वैतागून निघून गेले.
आपल्या भाषणातून प्रदेशाध्यक्ष पटोले आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दोन वेळा कुठे आहे धवल असा उल्लेख केला परंतु जिल्हाध्यक्ष दिसले नाहीत. जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांचे या कार्यक्रमातून असे अचानक निघून जाणे याची गंभीर दखल प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी घेतल्याची चर्चा कार्यकर्त्यांमधून ऐकण्यास मिळाली.



















