सोलापूर जिल्ह्यातील मोहिते पाटील घराणं म्हंटले की, चर्चा तर होणारच…सोलापूर जिल्ह्यातील अकलूजकरांची गोष्ट आणि थाटच न्यारा असतो.
सध्या सोलापूर शहर व जिल्ह्याच्या राजकिय वर्तुळात मागील काही दिवसात केवळ आणि केवळ काँग्रेसचे नूतन जिल्हाध्यक्ष डॉ धवलसिंह मोहिते पाटील यांच्याच नावाची चर्चा सर्वत्र ऐकण्यास मिळते. 15 दिवसांपूर्वी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदी अनपेक्षितपणे डॉ धवलसिंह मोहिते पाटील यांच्या नावाची घोषणा झाली, इच्छुकांचा चांगलाच हिरमोड झाला मात्र पर्याय नव्हता, अध्यक्षपद मिळवण्यासाठी मोहिते पाटलांना व्हाया लातूर मार्गे प्रभारी एच के पाटलांपर्यंत जावे लागले आहे. म्हणूनच बॅनर वर आमदार धीरज देशमुख यांचा फोटो दिसून आला,
सोलापुरात काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये बुधवारी अशी चर्चा होती की पदग्रहन कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, आमदार प्रणिती शिंदे यांची उपस्थिती नाही हा कार्यक्रम घेणे योग्य आहे का? मात्र दिवस ठरला होता दोन प्रमुख नेते नसले तरी माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, माजी आमदार रामहरी रुपनवर, शहराध्यक्ष प्रकाश वाले, जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे यांची उपस्थिती होती, अकलूज वरून निघाल्यानंतरच सोलापूरात चर्चा होती कधी येणार याची, साडे अकराच्या सुमारास त्यांचे सोलापूरात आगमन झाले,
सुरुवातीला छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून ते पुढे छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता अहिल्याबाई होळकर, चार हुतात्मा पुतळा, डॉ बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे या महापुरुषांना अभिवादन करून ग्रामदैवत सिद्धेश्वर, शाहजहूर अली दर्गा येथे दर्शन घेऊन जिल्हा परिषद आवारातील सहकारमहर्षी शंकरराव मोहीते पाटील यांना पुष्पहार अर्पण करून त्यांचे आगमन काँग्रेस भवनात झाले याठिकाणी बंजारा समाजाच्या पारंपरिक पद्धतीने कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले, मोठया मनाने जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे यांनी भवनाच्या गेटवरच नूतन अध्यक्षांचे स्वागत केले. धवलसिंहांबरोबर आलेल्या गाड्यांचा ताफा एवढा मोठा होता की, रंगभवन चौकापर्यंत रस्त्याच्या दोन्ही तरफा वाहने होती, जिल्हा परिषदेत वाहने होती, झेडपीच्या उपोषण गेटसमोर वाहने होती, उत्तर पंचायत समिती समोर वाहने होती, काँग्रेस भवन कार्यकर्त्यांच्या गर्दीने बऱ्याच दिवसांनी तुटुंब भरून वाहले, जिल्हा परिषदेच्या माजी विरोधी पक्षनेत्या त्यांच्या मातोश्री पद्मजादेवी मोहिते पाटील यांच्या सोबत होत्या.
पत्रकारांना वाटत होतं की, धवलसिंह हे काही तरी भडक स्टेटमेंट करतील मात्र अतिशय शांत, संयमाने त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली, आठवड्यातून एक दिवस काँग्रेस भवनात आणि इतर दिवशी ते ग्रामीण मध्ये राहतील असे त्यांनी सांगितले, सर्व ज्येष्ठांशी समन्वय साधून सर्वाना सोबत घेऊन काँग्रेस पक्षाला उभारी देण्याचा विश्वास त्यांनी पक्षाला दिला आहे.
आगामी निवडणुकीत त्यांना आपल्या भाऊबंदकी विरोधात लढावे लागणार आहे .भविष्यात आक्रमक नेत्यांची ही त्यांना सोबत लागणार आहे, प्रशासनावर वचक असणारे, कार्यकर्त्यांना पळवणार्या नेत्यांना सोबत घेऊन काम करावे लागणार आहे. धवलसिंह किती दिवस राहतात काँग्रेसमध्ये..अशी टीका टिप्पणी विरोधी पक्षांकडून होत आहे, तसेच त्यांच्यावर पक्ष बदलू ची होत असलेली टीका पुसून टाकण्याची मोठी संधी धवलसिंहांना चालून आली आहे, या पदाला त्यांनी न्याय द्यावा अशी अपेक्षा काँग्रेसच्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांना आहे.

























