सोलापूर : प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद सोलापूर यांच्यावतीने व स्वानंद परिवार मोहोळ प्रस्तुत महाराष्ट्राची लोकधारा” या संगीतमय सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन श्री शिवछत्रपती रंगभवन सभागृहात आयोजित करण्यात आला होता. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.
कार्यक्रमास माध्यमिक शिक्षणाधिकारी जावेद शेख, प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय जाविर, शिक्षणाधिकारी सुलभा वटारे, कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, नरेंद्र खराडे, समाज कल्याण अधिकारी सुनील खमीतकर यांच्यासह जिल्हा परिषदेचे शिक्षक, अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.
उद्घाटनपर भाषणामध्ये स्वामी यांनी कार्यक्रमाला उपस्थिती पाहून नाराजी व्यक्त केली. दहा हजार शिक्षकांचा जिल्हा म्हणून आपण सांगतो परंतु या शिक्षकांच्या कार्यक्रमाला शंभर ही शिक्षक हजर नाहीत हे आमचं नाही, शिक्षकांचे दुर्दैव असल्याची खंत व्यक्त करत त्यांनी तब्बल दोन तास कार्यक्रमाला उपस्थिती लावली नंतर गर्दी वाढत गेल्याने कार्यक्रमात रंगत आली.
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा या गीताने कार्यक्रमाला सुरुवात झाली त्यानंतर गणेश वंदना झाली, पुढे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यावरील ओवी सादर करण्यात आली. जीवाचा मैतर ढवळ्या अन् पवळ्या या ग्रामीण गीताने कार्यक्रमात रंगत वाढवली. त्यानंतर पंढरपूर तुळजापूरची भक्ती सांगणारी गीते सादर झाली. लावणी, भारुड, गोंधळी गीतामुळे उपस्थित श्रोत्यांना खिळवून ठेवले.
यावेळेस स्फुल्लिंग चेतले ते, छत्रपती शिवाजी महाराजांच्या गीतामुळे आणि त्यातील अफजलखान वधाचा प्रसंग अंगावर शहारे आणून गेला, या गीतानंतर सभागृहात ‘जय भवानी जय शिवाजी’चा एकच जयघोष झाला. यामध्ये अफजलखानाचे पात्र केलेल्या शिक्षकाने यावेळी ‘जय भवानी, जय शिवाजी’चा घोषणा दिल्याने उपस्थितानी टाळ्यांचा कडकडाट करत या ग्रुपचे अभिनंदन केले.
या कार्यक्रमाचे महेश कोटिवाले व डॉ माधुरी भोसले यांनी खुमासदार शैलीत सूत्रसंचालन करीत महाराष्ट्राची लोकधारा उभी केली.




















