सोलापूर लघू पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी यांना हिप्परगा तलाव येथे सुरक्षा यंत्रणा राबविण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले.
सोलापूर शहरास वरदान ठरलेले हिप्परगा तलाव हे सोलापूर वासियांसाठी अलिकडच्या काळात एक शाप म्हणून पाहावयास मिळत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या तलावात पोहण्यास जाणाऱ्या तरुणांचा तलावाच्या आजू बाजूच्या परिसरात कोणत्याही प्रकारची सुरक्षा यंत्रणा नसल्याने व तलावातील गाळ वेळच्यावेळी न काढल्याने मृत्यू होत असून अशा तरुणांचे कुटुंब हे निराधार होत चालले आहे. ही तरुण मुले गरीब, कामगार व मध्यमवर्गीय कुटुंबातील असल्याने शहरातील जलतरण केंद्रात त्यांना शुल्क भरणे अशक्य असल्याने हिप्परगा तलावात जलतरणासाठी येतात.
अवघ्या पाच ते सहा दिवसांपूर्वीच शहरातील दोन तरुण जलतरणासाठी तेथे आले असता दुर्दैवाने त्यांचा बुडून अंत झाला. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जेष्ठ नेते सुधीर खरटमल यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर लघु पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी यांना तलाव परिसरात सुरक्षा रक्षक नेमण्याबाबत निवेदन देण्यात आले. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी येत्या २ दिवसात सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात येईल जेणेकरून भविष्यात अशी कोणतीही दुर्घटना घडणार नाही असे आश्वासन दिले.
यावेळी निवेदन देताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रिया पवार, मोनिका सरकार, विठ्ठल व्हनमारे, प्रा.राहुल बोळकोटे, सूर्यकांत शिवशरण, दयानंद लिंगराज, निलेश होटकर, रामप्रसाद शागालोलू, शक्ती कटकधोंड आदी उपस्थित होते.


















