सोलापूर : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर रुजू झाल्यानंतर मनीषा आव्हाळे यांनी सुरूवातीला कामकाजाला शिस्त लावण्याचे पहिले काम केले. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे दालन आणि त्याच्या बाजूला असलेल्या मीटिंग हॉल अर्थात व्हिडिओ कॉन्फरन्सिंग रूममध्ये बसून बराच वेळ कामकाज करावे लागते. परंतु हे कामकाज करताना सीईओच्या जुन्या दालनात आणि शेजारी असलेल्या मीटिंग हॉलमध्ये अधिकाऱ्यांची कुचंबणा होत होती. त्याला कारण हे तसेच. या दोन्ही ठिकाणी खेळती हवा नसल्याने आणि बंदिस्त कार्यालय असल्याने तासन् तास बैठकीला आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगला बसणाऱ्या अधिकाऱ्यांना त्रास सहन करावा लागत होता.
या सर्व बाबींचा विचार करून मुख्य कार्यकारी अधिकारी आव्हाळे यांनी आपले संपूर्ण दालन आणि मीटिंग हॉलची जागा बदलण्याचा निर्णय घेतला. जिल्हा परिषदेच्या दर्शनी भागात असलेल्या अर्थ विभागाची संपूर्ण जागा त्यांनी घेतली आणि त्या ठिकाणी आपले नवीन दालन आणि कॉन्फरन्स हॉल तयार केला. मागील दोन महिन्यांमध्ये हे काम करण्यात आले. शनिवारी त्यांनी या कार्यालयात प्रवेश करून कॉन्फरन्स हॉलमध्ये अधिकाऱ्यांची पहिली बैठक घेतली. अतिशय प्रशस्त जागेमध्ये आणि मोकळ्या वातावरणात ही बैठक झाल्याने अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावरही आनंद पाहायला मिळाला. कार्यालय पाहिले असता अतिशय कॉर्पोरेट असा लूक दिसून येतो. मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी या नव्या दालनातून आपले कामकाज सुरू केले आहे.
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनीही तत्कालीन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्यासाठी केलेल्या दालनात बसण्याऐवजी त्यांनीही स्वतंत्र स्वतःचे दालन तयार करून घेतले आणि त्यांनी पूर्वीच्या दालनची ती जागा मीटिंग हॉलसाठी तयार केली आहे. त्यानुसारच सीईओ आवळे यांनीही आपले दालनाची जागा बदलून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला शोभेल असे हटके दालन तयार केले असून ते आता सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.