सोलापूर (प्रतिनिधी)काँग्रेस पक्षातील ज्येष्ठ नेते माजी शहराचे अध्यक्ष सुधीर खरटमल यांनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षाच्या मेळाव्यात काँग्रेस पक्ष सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासोबत माजी महापौर नलिनी चंदेले यांचाही प्रवेश झाला.
सुधीर खरटमल यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाने पक्षाची ताकद आणखी वाढली आहे, खरटमल यांची सर्व सामान्यांमध्ये असलेली ओळख याचा निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेसला आगामी महापालिकेच्या निवडणुकीमध्ये फायदा होणार आहे. याच पार्श्वभूमीवर खरटमल यांचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विद्या लोलगे यांनी पक्षात स्वागत केले असून त्यांचा सत्कार केला. यावेळी प्रांतिक सदस्य महेश निकंबे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस प्रशांत बाबर, माजी परिवहन सभापती आनंद मुस्तारे, गौरव शहा यांची उपस्थिती होती.
सत्काराला उत्तर देताना खरटमल म्हणाले, आगामी महापालिकेच्या निवडणुकीत निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा महापालिकेवर फडकला शिवाय राहणार नाही, त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न आपण करणार आहे. शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचा महापौर करून ते गिफ्ट आपण सर्व पदाधिकाऱ्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना द्यावे अशी अपेक्षा व्यक्त केली.


















