सोलापूर : ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या सोयीसाठी सोलापूर जिल्हा परिषद अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या नेहरू शासकीय वसतीगृह लवकरात लवकर सुरू करण्याचा निर्णय जिल्हा परिषद प्रशासनाने घेतला आहे.
हे वसतिगृह सुरू करण्यासाठी विविध पक्षाच्या विद्यार्थी संघटनांनी निवेदने देऊन लक्ष वेधून घेतले होते, काही विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. स्वच्छता टेंडर न काढल्याने हे वसतिगृह अद्याप सुरू झालेले नाही. वसतिगृहाच्या दुरुस्तीचा विषय प्रलंबित आहे.
शुक्रवारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, बांधकाम कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे, प्राथमिक शिक्षण अधिकारी संजय जावीर यांनी नेहरु वसतीगृहाला भेट देऊन सर्वत्र पाहणी केली.
तिन्ही मजले तसेच छतावर जाऊन पाहणी करण्यात आली. याठिकाणी बरीच अस्वच्छता दिसून आली, त्यानंतर काही किरकोळ दुरुस्ती करणे गरजेचे असल्याचे निदर्शनास आले. तिसऱ्या मजल्यावरील छत पावसाने गळते त्याची दुरुस्ती करणे गरजेचे असल्याचे खराडे यांनी सांगितले. याला अपेक्षित खर्चाची चर्चा झाली, कोहिनकर हे याबाबत अतिशय सकारात्मक दिसून आले. त्यांनी तातडीने हा विषय मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्याचे ठरले.
नेहरू वसतिगृहाच्या भोवती जिल्हा परिषदेचे 17 गाळे आहेत, 77 लाखाची थकीत गाळे भाडे वसुली बाकी आहे. त्याला 15 ऑगस्ट पर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर जिल्हा परिषद कडक पाऊल उचलणार आहे.