सोलापूर : भारतीय डाक विभाग, परिवर्तन समूह बहुउद्देशीय संस्था व सोलापूर सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूरच्या चार हुतात्म्यांवरील पोस्ट तिकिटाचे अनावरण नियोजन भवन येथील सभागृहात केंद्रीय संचार राज्यमंत्री देवूसिंह चौहान यांच्या हस्ते करण्यात आले. या सोहळ्याला माजी सहकार मंत्री आमदार सुभाष देशमुख आमदार सचिन कल्याण शेट्टी महापौर श्रीकांचना यंनम, जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त पी शिवशंकर, पोस्ट विभागाचे हरीश अग्रवाल व मधूमिता दास यांची प्रमुख उपस्थिती होती. अकोल्याचे खासदार संजय धोत्रे हे अकोल्यावरून ऑनलाइन जॉईन होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमृता अकलूजकर यांनी केले.
यावेळी आपल्या भाषणात केंद्रीय राज्यमंत्री चौहान यांनी सांगितले, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील ज्यांचा इतिहास आजपर्यंत कोणासमोरही आला नाही अशा अनसंग हिरोंना प्रकाशित करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे त्याच माध्यमातून सोलापूरच्या या चार हुतात्म्यांच्या पोस्ट तिकिटाचे अनावरण झाले असून आता यांचा इतिहास संपूर्ण देशभरात जाईल. भारत देश स्वातंत्र्याचा 75 वा महोत्सव साजरा करत आहे त्यामुळे सोलापुरात वेगवेगळे उपक्रम हाती घ्या, 75 रक्तदान शिबिरे भरवा, 75 मेडिकल शिबिर घ्या, 75 हजार वृक्ष लागवड करण्याचा मानस करा, असे आवाहन मंत्री चौहान यांनी केले.
खासदार जय सिद्धेश्वर स्वामी म्हणाले, सोलापूरच्या चार हुतात्म्यांचा इतिहास हा सुवर्ण अक्षराने लिहिणारा आहे मात्र तो उजेडात आलेला नाही. आमदार सुभाष देशमुख यांनी मागणी केलेल्या प्रमाणे हा इतिहास पुस्तकांमध्ये प्रकाशित करण्याबरोबरच सोलापूर जिल्ह्याला तीर्थक्षेत्र म्हणून केंद्र सरकारने मान्यता द्यावी अशी मागणी मंत्री देवुसिंह चौहान यांच्याकडे केली.
आमदार देशमुख म्हणाले, सोलापूर सोशल फाउंडेशन च्या माध्यमातून सोलापूरच्या तीर्थक्षेत्र पर्यटनाचे केंद्राचे मार्केटिंग कायम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जातो मात्र चार हुतात्म्यांचा इतिहास हा झाकला गेला आहे त्यासाठी फाउंडेशन च्या वतीने वेब सिरीज तयार करण्यात येत आहे त्याचबरोबर हा इतिहास सरकारच्यावतीने पुस्तकांमध्ये अभ्यासक्रमात घ्यावा अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली.


















