प्रेमसंबंधास आड आलेल्या आई, भाऊ व बहीण या तिघांचा खून केल्याप्रकरणी काजल जाधव व रतन जाधव या सख्या बहिणीं विरुध्द भरण्यात आलेल्या खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. शब्बीर औटी यांच्या समोर होऊन न्यायाधीशांनी आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
![]() |
| Adv jaydeep Mane |
या खटल्याची हकीकत अशी की, यातील आरोपी काजल रणछोड जाधव व रतन रणछोड जाधव या दोघी बहिणींचे लग्न तिचे वडील रणछोड जाधव यांनी त्यांच्या इच्छेविरुध्द दुसऱ्याकडे ठरविले होते. आरोपींना मुले पसंत नसतानासुध्दा त्यांची लग्ने तिचे वडील व आई लावून देणार होते. यातील आरोपी काजल धूना हिचे हिरज येथील एका मुलाबरोबर प्रेमसंबंध असल्याचे कळाल्यानंतर तिचे वडील रणछोड जाधव, आई हतयबाई, बहीण लाखी व भाऊ मफा यांनी त्यांना मारहाण व जाचहाट करायला सुरुवात केली होती.
यातील आरोपी क्र. २ रतन हिच्यासुध्दा चारित्र्याचा संशय घेऊन तिचे वडील, आई, भाऊ व बहीण तिला मारहाण व जाचहाट करत होते. मयत भाऊ मफा हा विनाकारण संशय घेऊन दोघी बहिणींना मारहाण करत असायचा. यामुळे आरोपी चिडून होते. घटने अगोदर आरोपींनी २४ तासात तुम्हाला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली होती. दिनांक ०४/०४/२०१८ रोजी वडील रणछोड जाधव हे गुजरात येथे गेलेले होते. याच संधीचा फायदा घेऊन दोन्ही आरोपींनी कट रचून दि. ०६/०४/२०१८ रोजी सर्वात आधी भाऊ मफा व बहीण लाखी यांचा डोक्यात पहारीने मारुन खून केला व त्यानंतर बाहेर गेलेली आई हतयबाई घरी आल्यानंतर आईचा देखील पहारीने मारुन खून केला असे सरकार पक्षाचे म्हणणे होते. तपास पूर्ण करून पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्रक दाखल केले.
खटल्याचे सुनावणी वेळी आरोपीचे वकील ॲड. जयदीप माने यांनी आपल्या युक्तिवादामध्ये न्यायालयासमोर आलेले पूरावे व जबाबावरील तफावती मांडल्या आणि मांडलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधिशांनी या तिहेरी खून खटल्यातून सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. या खटल्यात आरोपींतर्फे ॲड. जयदीप माने यांनी तर सरकारतर्फे ॲड. एन. बी. गुंडे यांनी काम पाहिले.



















