राज्यातील आगामी महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने मुंबईमध्ये आपल्या सर्व जिल्हा प्रमुखांची बैठक घेतली.यामध्ये सोलापूर जिल्ह्यातून पुरुषोत्तम बरडे, गणेश वानकर, संभाजी शिंदे, धनंजय डिकोळे हे उपस्थित होते.
गुरुवारी सोलापूरच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचे सचिव खासदार अनिल देसाई, विश्वनाथ नेरूरकर तसेच सचिव मिलिंद नार्वेकर यांच्याशी चर्चा केली. शुक्रवारी मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत तब्बल पंचावन्न मिनिटे मातोश्रीवर चर्चा झाली. उद्धव ठाकरे यांनी यावेळी सर्व जिल्हाप्रमुख यांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आघाडी करायची की नाही हे माझ्यावर सोडा, तुम्ही फक्त शंभर टक्के पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न करा, मी राज्याचा मुख्यमंत्री आहे असे असताना पक्षाची महाराष्ट्रात वाताहात व्हायला नको, पक्षाची बांधणी संघटन मजबुतीसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य मुख्यमंत्री म्हणून मी करेल असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी सोलापूरच्या पदाधिकाऱ्यांना दिला,
यापुढे शतप्रतिशत शिवसेना हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून राज्यात 12 ते 24 जुलै दरम्यान शिवसंपर्क अभियान राबवण्यात येणार आहे, ग्रामीण भागातील पंचायत समिती गण नुसार व शहरी भागात प्रभाग निहाय हे अभियान राबवले जाणार असल्याचं सोलापूरचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी सांगितले.
सोलापूर शहरातील शिवसेनेची परिस्थिती पाहता प्रचंड असे काम या पदाधिकाऱ्यांना करावे लागणार आहे. महापालिकेच्या तोंडावर शिवसेनेला किती धक्के बसणार यांचं गणित नाही. ग्रामीण भागात शिवसेना मजबूत असली तरी प्रमुख नेते मात्र इतर पक्षात आहेत जे आहेत ते कितपत सक्रिय आहेत हा मोठा प्रश्न शिवसेनेसमोर आहे.


















