सोलापूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जेष्ठ नागरीक विरंगुळा केंद्र स्थापन करण्याची घोषणा केली होती. त्याअनुषंगाने सर्व महानगरपालिका, नगरपरिषदा व नगर पंचायती यांच्याकडे उपलब्ध असलेल्या इमारतीमध्ये स्वनिधीतून जेष्ठ नागरीक विरंगुळा केंद्रे तातडीने सुरु करावेत व तेथे जेष्ठ नागरिकांसाठी वाचनालय, विविध बैठे खेळ तसेच इनडोअर खेळ आणि अन्य करमणुकीच्या सुविधा उपलब्ध करून देणे बाबत उप सचिव महाराष्ट्र शासन यांचे कडून दि. १५ जून २०२३ ने कळविण्यात आलेले होते.
त्यानुसार सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने विणकर बागेत ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र उभारण्यात आले असून त्याचे उद्घाटन आमदार विजयकुमार देशमुख मालक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नागरिक शहद मैंदर्गी, सिद्धाराम कोंडे, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपअभियंता किशोर सातपुते, झाकीर हुसेन नाईकवाडी किशोर तळीकडे, गणेश गुज्जा, भूतडा, माजी नगरसेवक अमर पुदाले, माजी नगरसेविका सोनाली मूटकरी, जिलानी सगरी, सतीश महाले, आनंद बिरू आदी मान्यवर उपस्थित होते.
सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र उभारण्यात आले आले असून सोलापूर शहरातील विणकर बागेत या ठिकाणी जेष्ठ नागरिक हे सकाळी व सायंकाळी वॉकसाठी येत असतात. त्याचा फायदा ज्येष्ठ नागरिकांना व्हावा म्हणून या ज्येष्ठ नागरिक केंद्राची उभारणी करण्यात आली. या केंद्रामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी वाचण्यासंदर्भात वर्तमानपत्र, कॅरम, बुद्धिबळ, लुडो गेम विविध बैठक खेळ, इनडोर खेळ अन्य करमणुकीचे सुविधा या ठिकाणी उपलब्ध करण्यात आले आहे.
हे केंद्र सकाळी सहा ते नऊ व सायंकाळी चार ते आठ वाजेपर्यंत ज्येष्ठ नागरिकांसाठी खुले ठेवण्यात येणार आहे. तरी ज्येष्ठ नागरिकानी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार विजयकुमार देशमुख यांनी केले.



















