सोलापूर – शहर व जिल्हयातील ऑटोरिक्षाच्या प्रवासी भाड्यात सोमवार, 18 जुलैपासून वाढ करण्यात येणार आहे. त्यानुसार आता पहिल्या दीड किलोमीटरसाठी किमान 23 तर त्यापुढील प्रत्येक एका किलोमीटरसाठी किमान 15 रुपये मोजावे लागणार आहेत. अगोदरच महागाईचे चटके सहन करीत असलेल्या सर्वसामान्य नागरिकांना या भाडेवाढीमुळे चांगलाच धक्का बसला आहे.
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) या भाडेवाढीला मान्यता दिली आहे. नव्या भाडेवाढीनुसार महापालिका क्षेत्रातील रिक्षांसाठी रात्री 12 ते पहाटे पाच या वेळेत 25 टक्के तर ग्रामीण भागातील रिक्षांसाठी 40 टक्के अतिरिक्त भाडे निश्चित करण्यात आले आहे. आता भाडेवाढ होणार असल्याने रिक्षाचालकांनी त्यांच्या मीटरचे पुर्नप्रमाणिकरण करुन घेण्यास 90 दिवसांचा कालावधी म्हणजे 17 ऑक्टोबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
या कालावधीत रिक्षाचालकांनी मीटरचे प्रमाणीकरण करून घ्यावे. जे रिक्षाचालक मीटरचे प्रमाणीकरण करणार नाहीत. त्यांनी भाडेवाढ मागता येणार नाही, असे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने स्पष्ट केले आहे. या भाडेवाढीमुळे रिक्षाचालकांमध्ये आनंदाचे वातावरण असले तरी प्रवाशांत मात्र नाराजीचा सूर आहे. आता नुकतेच पेट्रोल, डिझेलचे दर कमी करण्यात आले आहेत. असे असताना कशाच्या आधारे भाडेवाढ केली. असा सवाल सर्वसामान्य नागरिकांतून विचारला जात आहे.