सोलापूर : स्वतः पती-पत्नी दोघेही शालेय शिक्षक असूनही जास्त पैसा कमावण्यासाठी बांधकाम व्यवसाय, शेअर गुंतवणूक, भिशी चालविण्याचा व्यवसाय सुरू केला आणि त्यात आर्थिक अडचणीत येऊन कर्जबाजारी झालेल्या पतीने नैराश्येतून पत्नीचा खून करून स्वतः आत्महत्येचा प्रयत्न केला. परंतु याप्रकरणी सोलापूरच्या न्यायालयाने आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.
आईचा खून करून बाप जन्मठेप भोगण्यासाठी तुरूंगात जात असताना आई-वडिलांना पोरका झालेल्या सहा वर्षाच्या अनाथ मुलाला आरोपी पित्याने दहा लाख रूपयांची नुकसान भरपाई देण्याचा आदेशही प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. ए. ए. आर. औटी यांनी या खटल्याचा निकाल सुनावताना दिला आहे. विकास विश्वनाथ हरवाळकर (वय ३६, रा. नीता रेसिडेन्सी, जुळे सोलापूर) असे जन्मठेपेची शिक्षा आणि मुलास नुकसान भरपाई देण्याचा आदेश झालेल्या आरोपीचे नाव आहे. १४ डिसेंबर २०२० रोजी रात्री स्वतःच्या घरात आरोपी विकास याने आपली पत्नी अर्चना (वय ३४) हिचा तीक्ष्ण हत्याराने भोसकून खून केला आणि नंतर स्वतः आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा त्याच्यावरील आरोप न्यायालयात सिध्द झाला. धक्कादायक बाब अशी की, आरोपी विकास याने घरात आपल्या सहा वर्षाच्या एकुलत्या एक मुलाच्या समक्ष हे कृत्य केले होते.
या घटनेने मुलगा प्रचंड भेदरला खरा; परंतु न्यायालयात त्याने सरकार पक्षाच्या विरोधात साक्ष दिली होती. त्याच्या आत्यानेही सरकार पक्षाविरूध्द उलटून आरोपीच्या बाजूने साक्ष दिली होती. परंतु जिल्हा सरकारी वकील प्रदीपासिंह राजपूत यांनी चिमुकला अनाथ मुलगा आणि त्याच्या आत्याची कौशल्याने उलट तपासणी करून सरकारी पुरावा शाबीत केला. वैद्यकीय आणि परिस्थितीजन्य पुरावा, पंचनामे, पोलीस तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक शीतलकुमार कोल्हाळ आदी १७ जणांची साक्ष महत्वाचा दुवा ठरला. आरोपी विकास व त्याची पत्नी मृत अर्चना दोघेही जिल्हा परिषद शाळेत शिक्षक होते. सुखासीन जीवन जगताना विकास यास आणखी पैसा कमावण्याचा मोह झाला. पुरेसा अनुभव नसताना त्याने बांधकाम विकासकाचा व्यवसाय सुरू केला. शेअर बाजारातही पैसा गुंतविला. त्याने भिसीचाही व्यवसाय केला. परंतु यात आर्थिक तोटा होऊन तो कर्जबाजारी झाला. त्यामुळे वैफल्यग्रस्त होऊन त्याने स्वतःच्या व्हाटस् अपच्या स्टेटसवर फाशीच्या दोराचे चित्रासह ‘ साॕरी, आपल्या विश्वासाला पात्र ठरलो नाही. सर्व काही हरवले आहे’ असा मजकूर प्रसारीत केला आणि पत्नीचा खून करून स्वतःला संपविण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात निष्पन्न झाले होते.


















