सोलापूर : महाविकास आघाडीच्या सरकारला खाली खेचून राज्यात शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले. त्यामुळे शिवसेनेत दोन गट पडले. मातोश्रीचे अनेक निष्ठावंत शिंदे यांना जावून मिळाले. सोलापूरात एकनाथ शिंदे समर्थक गट मोठा आहे. ते मुख्यमंत्री झाल्यानंतर शहरातील महेश कोठे समर्थक अमोल शिंदे, उमेश गायकवाड यांच्यासह मनोज शेजवाळ हे शिंदे गटात गेले. मनिष काळजे हे तर कट्टर एकनाथ भाई समर्थक. तानाजी सावंत हे सत्तेत असल्याने शिवाजी सावंत हे पण इकडेच राहिले. लक्ष्मीकांत ठोंगे पाटील यांनीही सत्तेच्या बाजूकडे राहण्यात समाधान मानले.
राज्यात आपला मुख्यमंत्री असताना या नेत्यांमध्ये समन्वय दिसत नाही. जो येईल त्याला पदे वाटण्यात आली, पक्षाचे शहरात कुठेही मध्यवर्ती कार्यालय नाही, अमोल शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात आपल्या जागेत स्वतःचे संपर्क कार्यालय केले, तिथे पाहिले तर दिलीप कोल्हे, नाना मस्के दिसतात. मनीष काळजे यांचे शुभराय गॅलरी जवळ कार्यालय असून तिथून ते लोकांची सेवा करतात. मनोज शेजवाळ यांचं रेल्वे लाईन इथले घरचं त्यांचं कार्यालय आहे, तिथे उमेश गायकवाड पहायला मिळतात. शेजवाळ यांना भेटायचे म्हटले तर दुपारी बारा एक नंतर जावे लागत असल्याची चर्चा आहे. लक्ष्मीकांत ठोंगे पाटील हे तर आपल्या विजापूर रोडवरील निवासस्थानी असतात ते कोणत्याही नेत्यासोबत सहसा दिसत नाहीत.
जिल्हा संपर्कप्रमुख प्राध्यापक शिवाजी सावंत आले तर ते शासकीय विश्रामगृहात आपला ठिय्या मांडतात तिथेच बैठका घेऊन पदाधिकारी कार्यकर्त्यांना भेटतात. ज्या बैठकीला मनीष काळजे असतात त्या बैठकीला अमोल शिंदे दिसत नाहीत. शिंदेच्या कार्यक्रमाला काळजे दिसत नाहीत. गटबाजी इतकी आहे की कार्यकर्तेही त्या गटबाजीत विभागले गेले आहेत.
सोलापुरात एकनाथ शिंदे शिवसेना गटाचे शहर प्रमुख कोण? हे बऱ्याच लोकांना माहीत नाही अशी मजेदार चर्चा ऐकण्यास मिळते. सोलापुरातील ज्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये समन्वय नाही त्याच पक्षातील ज्येष्ठ नेते माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटात प्रवेश केला. त्यांना तर समन्वयक म्हणून पद देण्यात आले आहे ज्या पक्षात समन्वय नव्हता तिथून आलेल्या हा नेता सेनेतील गटबाजी पाहता कसा काय समन्वय साधणार असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.



















