सोरेगाव येथील हबीबा बालकाश्रम मध्ये दिनांक १० जानेवारी रोजी तेथील मुलांसाठी क्रिएटर्स बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्यावतीने फ्री मॉल ही संकल्पना साकारण्यात आली. बालकाश्रमातील मुलांना मॉल नेमकं काय असत हे देखील माहीत नसत, पण या मुलांना माहित नसलेल्या गोष्टीचा आनंद मिळावा म्हणून फ्री मॉल तिथे उभारण्यात आला.
या मॉल मध्ये बाहेरच्या मॉल सारख्याच वस्तू ठेवण्यात आल्या. ज्यामध्ये कपडे, शालेय साहित्य, खेळणी, दैनंदिन लागणाऱ्या वस्तू, खाद्यपदार्थ इ. या वस्तू मुलांनी संस्थेकडून तयार करण्यात आलेल्या कागदी पिशवीत घेतल्या. आपल्याला हवी ती वस्तू इतरांप्रमाणे मॅालमधून घेताना मुलांचा आनंद व उत्साह पाहण्यासारखा होता.
प्रत्येक लहान मुलांना एखादी गोष्ट आवडली की त्या मागचा व्यवहार त्यांना लक्षात येत नसतो, म्हणजेच प्रत्येक आनंद पैसे देऊनच मिळतो असे वाटू नये म्हणून त्यांना काही अनोखा आनंद मिळावा आणि व्यवहारापलीकडील जग कळावे म्हणून ही फ्री मॉलची संकल्पना राबविण्यात आली, असे संस्थेच्या संस्थापिका श्रेया माशाळ यांनी सांगितले.
संस्थेच्या सचिवा प्रियंवदा पवार या बोलताना म्हणाल्या, यापुढे संस्थेकडून मुलांसाठी वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येतील. तसेच मुलांनीही त्यांचा आनंद शब्दातून व्यक्त केला.
एक आगळी-वेगळी संकल्पना आपल्या बालकाश्रमात राबविल्याबद्दल व्यवस्थापिका सुवर्णा बेले यांनी संस्थेचे आभार मानले.
याप्रसंगी व्यवस्थापिका बेले यांचा सत्कार क्रिएटर्स बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या संस्थापिका श्रेया माशाळ व सचिवा प्रियंवदा पवार यांच्या हस्ते करण्यात आला. या उपक्रमासाठी संस्थेचे सचिव प्रभाकर माशाळ, उपाध्यक्ष शक्ती कटकधोंड, खजिनदार मनीषा माशाळ, सदस्य वैष्णवी कुलकर्णी, परमेश्वर देवकते आदी उपस्थित होते.



















