सोलापूर : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर समन्वयक शेखर माने हे गुरुवारी सोलापूर दौऱ्यावर होते, त्यांनी नुकत्याच झालेल्या प्रभाग रचनेच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीला शहराध्यक्ष भारत जाधव, कार्याध्यक्ष संतोष पवार, महेश कोठे, मनोहर सपाटे,दिलीप कोल्हे, तौफिक शेख , आनंद चंदनशिवे, महिलाध्यक्ष सुनीता रोटे,गटनेते किसन जाधव या प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती. बैठकीत प्रभाग रचना, सभासद नोंदणी या विषयावर चर्चा झाली.
बैठकीनंतर शेखर माने यांनी पत्रकारांशी संवाद साधला. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहराची वाटचाल सुरू आहे. महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने झालेल्या प्रभाग रचनेवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कुणाचीही हरकत नाही, अंतर्गत धुसफूस कमी झाली असून समन्वय साधून वाद मिटले आहेत.
सोलापूर महानगरपालिकेत प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेसचा महापौर करण्याकडे वाटचाल सुरू असून 38 प्रभागातून तब्बल 270 जणांनी पक्षाकडे उमेदवारी देण्यासाठी अर्ज केला आहे. परंतू पक्ष जनतेमध्ये जाऊन त्यांच्या चॉईसने उमेदवार देणार आहे. सध्याची राजकीय परिस्थिती लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेस सोलापूर शहरात 50 जागा प्लस असल्याचा दावा समन्वयक माने यांनी केला आहे.
2017 साली झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला सोलापूरकरांनी 49 जागांवर विजय केले मात्र या पाच वर्षांमध्ये भाजपने सोलापूरकरांचा अपेक्षाभंग केला आहे स्मार्ट सिटी ची बोगस आणि अर्धवट कामे पाण्याचा प्रश्न, उड्डाणपुलाचा प्रश्न प्रलंबित आहेत. पाच वर्षात दुहेरी जलवाहिनी आणता आली नाही, रस्त्याची अवस्था अतिशय बिकट आहे, दोन देशमुखांमध्ये भांडण्यात पाच वर्ष गेली. त्यामुळे यंदा राष्ट्रवादी काँग्रेस जनतेसमोर पर्याय असून निश्चित महापौर आमचाच होईल असा विश्वास माने यांनी व्यक्त केला.















