सोलापूर : आंबेडकरी चळवळीतील पत्रकार दादाराव पवार यांच्यावर दाखल केलेले खोटे गुन्हे माघारी घेण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य हलगीनाद मोर्चा काढण्यात आला.
सोलापूर जिल्हाध्यक्ष लखन भंडारे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करून जिल्हा परिषदेकडे रवाना झाला. हा मोर्चा सिद्धेश्वर मंदिर पासपोर्ट कार्यालय मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर आला. हलगीच्या कडकडाटाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.
आंबेडकरी चळवळीतील पत्रकार दादाराव पवार यांच्यावर मोहोळ पोलिसांनी संगणमताने सराईत गुन्हेगारांमार्फत, खाजगी वसुलदारा मार्फत, आर्थिक लाभासाठी खोटे गुन्हे दाखल केले आहेत. हे महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष कदापि खपवून घेणार नाही. त्यांच्यावरील दाखल गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत अन्यथा हातात दंडुका घ्यायला आमचा पक्ष मागेपुढे पाहणार नाही असा इशारा लखन भंडारे व पुणे जिल्हाध्यक्ष विकास भोसले यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी दिला.



















