सोलापूर : पाणी समस्यावर मात करण्यासाठी जलसंधारण महत्वाचे आहे. शासनाने वेगवेगळ्या अभियानाच्या माध्यमातून दुष्काळी तालुक्यातील तलाव, विहीरी, नद्या, पुर्नजिवित केल्या आहेत. गावे टँकरमुक्त केली आहेत. एकरूख तलाव हा ब्रिटीशाच्या काळातील तलाव गाळमुक्त केला तर साठणार्या पाण्यातून हजारो हेक्टर जमीन ओलीताखाली येईल आणि जलसंधारणाच्या माध्यमातून परिसरातील गावे स्मृध्द होतील असे प्रतिपादन प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी व्यक्त केले.
राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाच्या वतीने गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार अभियान राबवण्यात येत आहे. सोलापूर जिल्हयामध्ये या अभियानाचा शुभारंभ बुधवारी उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डीजवळ एकरूख तलाव येथे प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता दयासागर दामा, कार्यकारी अभियंता पंडित भोसले भारतीय जैन संघटनेचे केतन शहा, शिवराज संस्थेचे अविनाश मार्तंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
ठोंबरे म्हणाले, या अभियानाअंतर्गत सोलापूर जिल्हात 122 ठिकाणी हे अभियान राबवले जाणार आहे. यासाठी 16 सामाजिक संघटनाची नियुक्त केली आहे. या संघटनेच्या माध्यमातून तलावातून गाळ काढून शेतकर्यांना मोफत दिला जाणार आहे. माजी सैनिक, विधवा. अंध, अपंग यांच्यासाठी वाहतुक सह मोफत गाळ दिला जाणार आहे. ज्या सामजिक संस्थाना हे गाळ काढण्याचे काम दिले आहे. त्यांना 35 घनमिटर प्रमाणे 37 हजाराचे अनुदान दिले जाणार आहे.
दरम्यान मार्डी येथिल शिवराज बहुउद्देशिय संस्थेच्या वतीने गाळ काढण्याचा शुभारंभ केला यासाठी संस्थेच्या वतीने दोन जेसीबी, चार हायवा तयार ठेवले आहेत. परिसरातील 24 शेतकर्यांनी गाळ घेऊन जाण्यासाठी नोंदणी केली असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष अविनाश मार्तेडे यांनी दिली. तर जलसंधारण विभागाचे अधिकारी दामा यांनी या योजनेची अधिक माहिती दिली.
यावेळी काशिनाथ कदम, संभाजी पाटील, विशाल मार्तेडे, शेखर पाटील, जयदत्त मार्तेडे, संजय सादिवाल, तात्या कदम यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.























