सोलापूर – दोन मुली आणि एक पुतणी अशा तीन मुली घरातून फूस लावून पळवून नेल्याची तक्रार पोलिसात दाखल झाली अन् तपासाची सूत्रे वेगाने फिरवण्यात आली. जाताना त्यांनी रोख रक्कम आणि दागिने नेले होते. २४ तासांत या गुन्ह्याचा तपास लावून या मुलींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील साडेसात लाखांची रोकड आणि तीन लाखांचे दागिने जप्त केले. मुलींसह मुद्देमाल नातलगांकडे सुपूर्द करण्यात आला. २४ तासांत तपास लागल्याने वाम मार्गाला लागण्यापासून त्यांची मुक्तता झाली.
शहरापासून जवळच असलेल्या एका गावात किराणा दुकान चालवून एकत्र कुटुंब वास्तव्यास होते. २७ सप्टेंबर रोजी यातील तक्रारदार महिलेची एक १८ वर्षाची सज्ञान, दुसरी १३ वर्षाची आणि दिराची १३ वर्षाची मुलगी अशा तिघी मुली २७ सप्टेंबर रोजी घरात साप निघाल्याचा बहाणा करुन दरवाजाला कडी लावून पळून गेल्या होत्या. जाताना त्यांनी लाखोंची रोकड आणि दागिने नेले होते. तातडीने मुलीची आईने सलगर वस्ती ठाण्यात कोणीतरी फूस लावून तिघींना पळवून नेल्याची तक्रार नोंदवली होती.
यात पळून गेलेल्या मुलींपैकी दोघी अल्पवतीन आहेत. घटनेची गांभीर्य ओळखून सलगरवस्ती पोलिसांनी पोलीस आयुक्तांच्या आदेशाने वेगाने तपासाची चक्रे फिरवली. संशयित इसम आणि गावातील नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार तांत्रिक माहितीच्या आधारे शोध घेतला. त्या नाशिक येथे असल्याचे समजले. पोलिसांनी नाशिक युनिट २ येथील पोलीस अंमलदाराची मदत घेऊन त्या मुलींचा शोध घेतला असता त्या औदुंबर स्टॉप सिडको अंबड येथे आढळल्या. त्यांना तेथून ताब्यात घेतले. अंबड पोलीस ठाण्यात नेऊन रोख रक्कम व दागिन्याबद्दल चौकशी केली. त्यांच्याकडून ७ लाख ५० हजार रोख रक्कम आणि अंदाजे तीन लाखांचे दागिने जप्त केले. पथकाने सोलापुरात आल्यानंतर मुलींसह वरील ऐवज त्यांच्या ताब्यात देण्यात आला.
ही कारवाई फौजदार सचिन मंद्रूपकर, हवालदार बालाजी पोतदार, अय्याज बागलकोटे, अविनाश डिगोळे, बाबुराव क्षीरसागर, मैना घुमरे यांनी यशस्वी केली.