सोलापूर : काँग्रेस पक्षातून बाहेर पडल्यानंतर ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल यांनी सोलापूरच्या खासदारकीवर आपला दावा केला आहे. यंदा सोलापूर लोकसभेची जागा राष्ट्रवादीला घ्यावी यासाठी कार्यकर्ते आग्रही मागणी करीत आहेत आणि उमेदवार म्हणून सुधीर खरटमल यांच्या नावाला पसंती दिली आहे. खरटमल यांच्या दाव्या नंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये काहीसे बिनसल्याचे पाहायला मिळाले.
सोलापूर लोकसभेची जागा ही काँग्रेसचीच आहे असे काँग्रेस नेत्यांकडून ठणकावून सांगण्यात आले. खरटमल यांच्या नावाची जोरदार चर्चा होऊ लागल्याने काँग्रेस पक्ष काहीसा अस्वस्थ झाला होता परंतु आता पुन्हा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या दौऱ्यानंतर आणि सुशीलकुमार शिंदे हे जिल्ह्यामध्ये फिरत असल्याने ही जागा काँग्रेसच घेणार हे आता निश्चित झाल्याचे चित्र आहे.
या एकूणच राजकीय घडामोडीनंतर एक जून रोजी दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप गावात एका काँग्रेसच्या कार्यकर्त्याचा वाढदिवस होता. त्या वाढदिवसानिमित्त सुशीलकुमार शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. याच कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे नेते सुधीर खरटमल यांनीही हजेरी लावली.
काँग्रेसच्या गोतावळ्यात खरटमल कसे? असा प्रश्न अनेकांना पडला. पण ज्या कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते त्यांनीच खरटमल यांना निमंत्रित केले होते, हा कार्यक्रम जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांच्या समर्थकांचा होता. या कार्यक्रमात शिंदे आणि खरटमल हे एकामेकाच्या शेजारी बसले. शिंदे यांना खरटमल हे अजूनही आपले नेते मानतात. तसे ते जाहीरपणे बोलून दाखवतात परंतु सुशीलकुमार शिंदे हे जर लोकसभेचे उमेदवार असतील तर आपण विरोध करणार नाही अशी ही भूमिका खरटमल यांची आहे.


















