सोलापूर : श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी पाडल्यानंतर धर्मराज काडादी यांचे समर्थन वाढत आहे. शुक्रवारी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दुपारी बाराच्या सुमारास त्यांच्या गंगा या निवासस्थानी भेट घेतली यावेळी बराच वेळ या दोन नेत्याची चर्चा झाली.
या भेटीनंतर सुशीलकुमार शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मी कॉलेजमध्ये असल्यापासून माझे काडादी यांच्याशी संबंध आहेत, असं काय सांगण्यासारखं नाही पण चिमणी पाडली याची चौकशी मी करायला आलो.
राजकारणातून चिमणी पाडण्यात आली या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले, मुळात चिमणी पाडण्याची गरजच नव्हती. आमची सर्व विमाने एका बाजूने उतरतात पायलटला व्यवस्थित सूचना दिल्यानंतर विमाने व्यवस्थित उतरतात आणि टेक ऑफ होतात. परंतु ज्यांना यांचे वाटोळे करायचेच होते त्यांनी ते केलं. चिमणी अनधिकृत म्हणजे ती गेली अनेक वर्षे तिथे आहे त्यांनी अधिकृत करण्याचा प्रयत्न केला, परंतु मला ती अनधिकृत आहे नाही याची माहिती नव्हती, मी ज्या वेळेस सत्तेत होतो त्यावेळेस जर माझ्या लक्षात आलं असतं तर मी ते अधिकृत करून दिले असते.



















