सोलापूर : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांना पदभार घेऊन साधारण साडेतीन महिने झाले आहेत. पदभार घेतल्यानंतर त्यांनी जिल्हा परिषदेमध्ये बरेच बदल केले आहेत. प्रशासनाला एक प्रकारे शिस्त लावण्याचे अतिशय महत्त्वाचे काम त्यांच्याकडून झाले असताना सध्या त्यांच्या कार्यालय शिफ्टींग आणि नूतनीकरण याप्रकरणी उलट सुलट चर्चा होताना ऐकण्यास मिळते.
याच पार्श्वभूमीवर गुरुवारी त्यांनी आपल्या नूतन कार्यालयात पत्रकार परिषद घेतली या प्रकरणी त्यांनी स्पष्टीकरण ही दिले. दरम्यान पत्रकारांनी त्यांना मागील तीन महिन्यांमध्ये आपण स्वतः कोणत्या अशा कामावर समाधानी आहात असा प्रश्न विचारला तेव्हा त्या म्हणाल्या सर्वात प्रथम केंद्र सरकारच्या अतिशय महत्त्वकांक्षी असलेल्या जलजीवन मिशन योजनेच्या विस्कटलेल्या कामात मी सुधारणा केली याच मला प्रथम समाधान आहे. जल जीवन मिशनच्या टेंडर प्रक्रियेत बराच गोंधळ होता यासाठी स्वतंत्र वार रूम काढून ही प्रक्रिया पारदर्शक करण्याचा प्रयत्न केला.
दुसरी समाधानकारक बाब म्हणजे पेन्शन प्रकरणी बरीच निकाली काढली. जो कर्मचारी सेवानिवृत्त होतो त्याच दिवशी त्यांच्या हातात पेन्शन ऑर्डर देण्यात येत आहे. तिसरी महत्त्वाची बाब म्हणजे सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये मी पदभार घेतल्यापासून स्वच्छतेकडे सर्वाधिक लक्ष दिले आहे त्यामुळे बरेच बदल पाहायला मिळतात. कार्यालय आणि परिसर स्वच्छतेकडे माझा कायम पाठपुरावा राहणार आहे.