कोरोनाची दुसरी लाट येण्याच्या अगोदर दोन महिने सीईओ स्वामी यांनी सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार स्वीकारला. दुसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून सीईओ स्वामी यांनी “माझे गाव कोरोना मुक्त गाव” व “माझे दुकान माझी जबाबदारी” हे दोन अभियान सुरू केले. दरम्यान सीईओ स्वामी स्वतः कोरोना बाधित झाले असताना त्यांनी दवाखान्यातून कामकाज सुरू ठेवले. कोरोनातून बरे झाल्यानंतर त्यांनी कामाचा सपाटा लावला आणि “गाव तिथे कोविड सेंटर” हे अभियान सुरू केले. सीईओ स्वामी यांच्या आवाहनाला जिल्ह्यातील अनेक गावांनी प्रतिसाद देत गावागावात कोविड केअर सेंटर उभे राहिले. याचा परिणाम म्हणून लोक गावातच उपचार मिळत असल्याने चाचणीसाठी पुढे येऊ लागले आणि कोरोनाचा मोठ्या प्रमाणात होणाऱ्या प्रसाराला आळा बसला. त्याच प्रमाणे शहरातील दवाखान्यात निर्माण झालेली बेडची टंचाई सुध्दा कमी होण्यास मदत झाली. नुकतेच राज्य शासनाने “गाव तिथे कोविड केअर सेंटर” अभियान राज्य पातळीवर राबविण्याचा निर्णय घेतला आहे. सोलापूर पॅटर्न म्हणून या अभियानाला गौरविले गेले. यामुळे गुरुवारी झालेल्या जिल्हा परिषद स्थायी समितीच्या बैठकीत जि.प. सदस्य उमेश पाटील यांनी सीईओ स्वामी यांचा अभिनंदनाचा ठराव मांडला व त्यास जि.प. सदस्य त्रीभुवन धाईंजे, नितीन नकाते यांनी अनुमोदन दिले.