सोलापूर : काही अधिकारी असे असतात की त्यांना कुणीही आठवणीत ठेवत नाहीत, त्यांची बदली झाली तेव्हा अनेक जण बरे झाले, हा अधिकारी गेला अशाही भावना व्यक्त करतात तर काही अधिकारी असेही आहेत की, ज्यांना कायम लोक आठवण ठेवतात. त्यांची जर बदली झाली तर त्याला विरोध होतो. असाच एक प्रसंग दक्षिण सोलापूरचे तहसीलदार अमोल कुंभार यांच्या बाबतीत घडला.
त्यांची नुकतीच बदली झाली आहे. त्यांना जिल्हा पुनर्वसन कार्यालयात तहसीलदार म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. दक्षिण सोलापूर तहसील कार्यालयात नव्याने अधिकारी आला नसल्याने त्यांनी अजून पदभार सोडलेला नाही.
मंगळवारी सायंकाळी साडे पाच ची वेळ. एक वृद्ध महिला दक्षिण तहसील कार्यालयात आली. ती महिला होती तालुक्यातील कर्देहल्ली या गावची. त्यांचे नाव होते चतुराबाई शिंदे. ती घरकुल मिळण्यासाठी प्रयत्न करत आहे. तिच्या मुलाने तिचे राहते घर पेटवून दिले त्यामुळे ती महिला बेघर झाल्याचे सांगण्यात आले. जेव्हा ती महिला कुंभार यांच्या कक्षात आली तेव्हा त्यांनी साहेब तुमचा बोर्ड वाचला अजूनही त्या बोर्डावर अमोल कुंभार असेच लिहिले आहे, त्यामुळे मी तुम्हाला भेटण्यासाठी आत आले. तुम्ही मला घर मिळवून द्या अशी विनंती त्या महिलेने केली.
तेव्हा अमोल कुंभार यांनी याप्रकरणी मी दक्षिण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बाळासाहेब वाघ यांच्याशी बोलतो, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही त्यांना जाऊन भेटा असे म्हणून त्या वृद्ध महिलेला समजावून सांगितले. तेव्हा “साहेब तुम्ही देव माणूस आहेत इथून सोडून जाऊ नका” असे शब्द त्या महिलेच्या तोंडून निघाले. यावरून कुंभार यांच्या कामकाजाची पद्धत आणि त्यांच्या स्वभावाची जाणीव निश्चितच त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या नागरिकांना झाली.



















