सोलापूर जिल्ह्यातील मोडनिंब गावच्या अंगणवाडीमध्ये शिकणाऱ्या अडीच वर्षाच्या इनाया मतीन बागवान या बालिकेच्या कानाची ‘cochlear implant’ ही शस्त्रक्रिया करायची होती. अतिशय महागडी शस्त्रक्रिया व सुमारे सहा लाख खर्च अपेक्षित असल्याने त्या पालकांची परिस्थिती पाहता ते शक्य नव्हते मात्र राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत तपासणी करून या बालिकेची शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर प्रदीप ढेले यांनी या शस्त्रक्रियेसाठी पुणे येथील अश्विनी मेडिकल फाउंडेशनच्या मोरया हॉस्पिटल येथे पाठवले त्या ठिकाणी यशस्वीरित्या शस्त्रक्रिया झाली.
त्या अडीच वर्षाच्या इनाया या बालिकेस एक प्रकारे दुसरा कान मिळाल्याचं आनंद त्या पालकांना झाला, आपली मुलगी सुखरूप बरी झाल्याने त्या बालिकेचे आई-वडील हे गुरुवारी जिल्हा परिषदेमध्ये आले त्या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांचे त्यांनी आभार व्यक्त केले, यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर ढेले, डॉक्टर शीतलकुमार जाधव, राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम समन्वयक ऍड भगवान भुसारी, डॉ अनिरुद्ध पिंपळे यांची उपस्थिती होती.
सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत जवळपास एक हजारच्या आसपास शस्त्रक्रिया झाल्या आहेत, त्यात 44 ह्रदयाच्या शस्त्रक्रियांचा समावेश आहे.
काय आहे कोक्लेयर इम्प्लांट ही शस्त्रक्रिया
आपल्या कानाच्या आतील बाजूस कोचलीया नामक केसांच्या लहान पेशी असतात. या पेशी सामान्यत: बाहेरून येणारे ध्वनी स्पंदने उचलतात आणि श्रवण मज्जातंतूंद्वारे मेंदूत पाठवतात. त्यामुळे कमी ऐकू येणाऱ्या लोकांना आवाज स्पष्ट ऐकू येण्यास मदत होते. कोक्लेयर इम्प्लांट हे एक लहान आणि जटिल इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे. एका विशिष्ट प्रकारच्या शस्त्रक्रियेनंतर ऐकण्याची क्षमता वाढते.

















