सांगोला तालुक्यातील कोळा येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस्थिविहार व अभ्यासिकेचे भूमिपूजन रविवार, दि. २० जून रोजी करण्यात येत असल्याची माहिती अँड सचिन देशमुख यांनी दिली. आमदार संजयमामा शिंदे, आमदार शहाजीबापू पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. याप्रसंगी उपाध्यक्ष दिलीप चव्हाण, अर्थ व बांधकाम समितीचे सभापती विजयराज डोंगरे, समाजकल्याण सभापती संगीता धांडोरे, कृषी सभापती अनिल मोटे, विरोधी पक्षनेते बळीराम साठे, सीईओ दिलीप स्वामी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे यांची उपस्थिती राहणार आहे.
महामानव डॉ. बाबासाहेब यांचे 6 डिसेंबर 1956 रोजी महापरिनिर्वाण झाले. त्यावेळी बाबासाहेबांचे निकटवर्तीय सहकारी व कोळे गावचे सुपुत्र कै. महिपतराव मोरे यांनी २५ डिसेंबर १९५६ रोजी बाबासाहेबांच्या अस्थींचा काही भाग कोळे येथे आणला. आर.डी. भंडारे यांच्या हस्ते या अस्थी दर्शनासाठी बौद्ध विहारात ठेवल्या. कै. मोरे हे मुंबईतील चाळीत राहत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीत सहभागी होण्याची संधी त्यांना मिळाली होती. या अस्थी ठेवण्यासाठी लोकवर्गणीतून १९४४ मध्ये मातीचे बांधकाम करून बौद्ध समाजमंदिर बांधण्यात आले. ही इमारत जीर्ण झाल्याने झेडपीच्या निधीतून या ठिकाणी भव्य अस्थिविहार बांधण्याचा प्रस्ताव तत्कालीन अध्यक्ष संजयमामा शिंदे यांच्याकडे दिला होता. यासाठी त्यांनी निधी मंजूर केला. दोन एकरांत पाच कोटी खर्चून भव्य आंबेडकर यांचे ६ डिसेंबर १९५६ रोजी अस्थिविहार, अभ्यासिका व इतर बांधकामे करण्यात येणार आहे.
कोळा जिल्हा परिषद गटाचे सदस्य एडवोकेट सचिन देशमुख यांनी मागील चार वर्षापासून हे अस्थि विहार होण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे यांच्या काळात हे मंजूर झाले, त्यानंतर विद्यमान अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांच्या काळात याची मुहूर्तमेढ रोवली गेली, अर्थ व बांधकाम सभापती विजयराज डोंगरे यांचा या चांगल्या कामाला निधी देण्यात मोठे योगदान आहे.