सोलापूर प्रिसीजन फाउंडेशनच्यावतीने येत्या २२, २३ आणि २४ ऑक्टोबर रोजी ‘प्रिसिजन गप्पा’ आयोजिण्यात आल्या आहेत. या कार्यक्रमाचे यंदा १३ वे पर्व आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रसिकश्रोत्यांना घरबसल्या ‘प्रिसिजन याचा आनंद घेता यावा या उद्देशाने यंदाच्या सलग दुसऱ्या वर्षीही हा कार्यक्रम ऑनलाईन प्रक्षेपित होणार आहे. प्रिसीजन कॅमशाफ्टचे चेअरमन यतिन शहा आणि प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा यांनी पत्रकार परिषदेत २०२१ सालच्या ‘प्रिसिजन गप्पा’बाबत माहिती दिली.
शुक्रवार, दि. २२ ऑक्टोबर रोजी पहिल्या दिवशी ‘म्युझिक कॅफे’ हा अनोखा सांगितिक कार्यक्रम अनुभवता येईल. भाडीपा अर्थात भारतीय डिजिटल पार्टी हा युट्यूब चैनल आणि अभंग रिपोस्ट हा कार्यक्रम सध्या चर्चेत आहे. भाडीपाचे सारंग साठे, निपुण धर्माधिकारी यांच्याशी मानसी जोशी यांनी मारलेल्या भन्नाट गप्पा रसिकांना ऐकायला मिळतील. प्रतिश म्हस्के, अजय बान्हा, स्वप्नील तर्फे, तुषार तोत्रे, विराज आचार्य, दुष्यन्त देवरुखकर या अभंग रिपोरटच्या टीमने पारंपारिक अभंगांना आधुनिक बँडच्या स्वरूपात सादर केले आहे. तरुणाईला आकर्षित करणारा हा कार्यक्रम यंदाच्या गप्पांचे वैशिष्ठच आहे.
शनिवार, दि. २३ ऑक्टोबर रोजी गप्पाच्या दुसऱ्या दिवशी तळमळीने सामाजिक कार्य करणाऱ्या दोन संस्थाना गौरविण्यात येईल. मतीमंद मुलींना ‘आधार’ देत मायेचं पांघरूण घालणाऱ्या तुळजाई प्रतिष्ठान (उस्मानाबाद) संखेला २०२१ गावचा प्रिसिजन सामाजिक कृतज्ञता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येईल, सन्मानचिन्ह आणि रुपये तीन लाख अशा स्वरूपाचा हा पुरस्कार संस्थेच्या वतीने श्री. शहाजी चव्हाण हे स्वीकारतील. दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असणाऱ्या लोकांपर्यंत भोजन पोहोचवून सातत्यपूर्ण अन्नसेवा करणाऱ्या रॉबिनहूड आर्मीला (सोलापूर) २०२१ सालचा ‘स्व. सुभाष रावजी शहा स्मृति पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येईल. सन्मानचिन्ह आणि रुपये दोन लाख अशा स्वरूपाचा हा पुरस्कार संस्थेच्या वतीने श्री. हिंदुराव गोरे हे स्वीकारतील. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मा. रेणूताई गावस्कर यांच्या हस्ते यंदाचा पुरस्कार प्रदान सोहळा होईल. त्यानंतर रेणूताईंच्या उत्तुंग कार्यावर श्री. मिलिंद वेर्लेकर हे मुलाखतीच्या माध्यमातून प्रकाशझोत टाकतील.
अशोक सराफ आणि निवेदिता सराफ या लोकप्रिय जोडीची प्रकट मुलाखत ही यंदाच्या गप्पांमधील पर्वणी असेल. रविवार, दि. २४ ऑक्टोबर रोजी ‘हृदयी वसंत फुलताना’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून सिनेरसिकांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या या दांपत्याची वाटचाल उलगडेल. ऋषिकेश जोशी यांनी सराफ दांपत्याशी साधलेल्या संवादातून रुपेरी पडद्यावरील आणि पडद्यामागील अनेक भन्नाट किस्से रसिकांना ऐकायला मिळणार आहेत.
















