सोलापूर : जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी सुनील खामितकर यांच्या कामाबाबत अनेक तक्रारी आहेत. मी त्यांना अनेक वेळा शो कास नोटीस बजावली आहे. तरीही त्यांच्या कामकाजात सुधारणा होत नाहीत. शेवटी मला त्यांचा बडतर्फीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवावा लागेल असा गंभीर इशारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी दिला आहे.
गुरुवारी सीईओ आव्हाळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी एका पत्रकाराने समाज कल्याणच्या तक्रारीबाबत तसेच खामितकर यांच्या कारभाराबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी वरील माहिती दिली. जिल्हा परिषद समाज कल्याणच्या अनेक तक्रारी आहेत, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी अनेक वेळा याबाबत खमीतकरांच्या समोर नाराजी व्यक्त केली आहे.
दिव्यांग विभाग पाहणारे वैद्यकिय सामाजिक कार्यकर्ता सचीदानंद बांगर यांच्या कारभारावर तर खुद्द खमीतकर नाराज असतात, त्या विभागाच्या अनेक तक्रारी आहेत, माहिती अधिकारातील माहिती दिली जात नाही, दिव्यांग विभागातील वेतन आणि फरकाच्या टक्केवारीचा विषय पुराव्यासह एका ज्येष्ठ पत्रकाराने बातमीतून उजेडात आणला होता.
याच विभागातील कनिष्ठ सहाय्यक लेखा शशी ढेकळे हे अनेक वर्षापासून तिथेच काम करत आहेत. मागच्या तीन वर्षापूर्वी बदली झाली होती, तेव्हा ही त्याला सोडले नाही, दरम्यान मे 2023 च्या बदल्या मध्ये शशी ढेकळे यांची बदली बार्शी येथे झाली असतानाही अजून पण त्यांना रीलीव्ह केले गेलेले नाही.
याप्रकरणी मुख्य वित्त व लेखा अधिकारी मीनाक्षी वाकडे यांनीही समाज कल्याण अधिकाऱ्याला दोन वेळा पत्र देऊन ढेकळे यांना रीलिव्ह का केले नाही असा प्रश्न उपस्थित केला आहे तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी आव्हाळे यांच्या बैठकीत शशी ढेकळे यांचा विषय झाल्याचे समजले. तरीही खमीतकर हे ढेकळे यांना सोडण्यास तयार नाहीत. यावरून ढेकळे मध्ये त्यांचा एवढा इंटरेस्ट का? असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.