सोलापूर : मोहोळ तालुक्यातील कोरवली येथील अमोघसिद्ध शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेला दीड एकर जागा बक्षीस पत्र म्हणून दिली. त्या बदल्यात मुलाला नोकरी लावण्याची आश्वासन संस्था चालकाने दिले. तशा तत्कालीन समाज कल्याण अधिकाऱ्यांकडून ऑर्डर ही काढण्यात आल्या. परंतु संस्था अजूनही पगार काढत नाही. सध्याचे समाज कल्याण अधिकारी म्हणतात त्यावेळेसच्या त्या ऑर्डर बोगस आहेत. याप्रकरणी चौकीदार रविकांत नंदुरे यांची फसवणूक झाली असून नंदुरेचे वडील यासाठी न्यायाची मागणी करत जिल्हा परिषदेच्या पायऱ्या झिजवत आहेत.
अमोलसिद्ध शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेसाठी तमान्ना नारायण नंदुरे यांनी कोरवली येथील गट क्रमांक 53 मधील क्षेत्र 60 आर ही जमीन चेअरमनच्या नावे बक्षीस पत्र म्हणून दिली होती त्या बदल्यात त्यांच्या मुलगा रविकांत नंदुरे यांना शिलाराम मागासवर्गीय मुलींचे वसतीगृह कोरवली याठिकाणी वसतिगृह चौकीदार म्हणून नोकरी लावण्याचे आश्वासन देण्यात आले.
त्याप्रमाणे जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाकडून 23 मे 2012 रोजी नंदुरे रविकांत तमान्ना यांची चौकीदार म्हणून ऑर्डर काढण्यात आली. त्यावर त्यावेळीचे समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर यांची सही आहे. पुन्हा त्याच अमोघसिद्ध शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेने अमोघसिद्ध मागासवर्गीय मुलींचे वसतीगृह कोरवली यासाठी पदे मंजूर करून रविकांत तमान्ना नंदुरे यांची चौकीदार म्हणून दिनांक 31 जून 2014 रोजी आणखी एक नव्याने ऑर्डर काढली त्यावेळी जिल्हा समाज कल्याण अधिकारी मनीषा फुले यांची त्या ऑर्डरवर सही आहे.
रविकांत नंदुरे हा अकरा वर्षापासून चौकीदार म्हणून काम करत आहे परंतु अद्यापही त्याचे वेतन काढण्यात आले नाही त्यासाठी त्याचे वडील तमन्ना नंदुरे हे जिल्हा परिषदेच्या पायऱ्या झिजवत आहेत त्यांनी सध्याच्या समाज कल्याण अधिकाऱ्यांना याबाबत निवेदन दिले असता संबंधित त्या वेळच्या ऑर्डर या बनावट आहेत ती आमची सही नाही असे समाज कल्याण अधिकारी म्हणतात. आता या प्रकरणात नंदुरे यांनी न्याय मागितला आहे.
चौकशी लावतो – संदीप कोहिणकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी
ऑर्डर तर जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या दिसतात, त्या बोगस आहेत की खऱ्या याची चौकशी झाली पाहिजे, जिल्हा परिषदेत येणाऱ्या प्रत्येक माणसांचे समाधान झाले पाहिजे, त्यासाठी या प्रकरणाची चौकशी लावतो.
सुनावणी घेणार – सुनिल खमीतकर, समाज कल्याण अधिकारी
हे प्रकरण फार जुने आहे, सुमारे अकरा वर्ष वेतन मिळाले नाही, एवढ्या दिवस तक्रारदार गप्प का होते? वसतिगृह टेबल ज्या कर्मचाऱ्यांकडे होता ते जमादार मयत झाले आहेत, रेकॉर्ड सापडत नाही म्हणून सुनावणी घ्यावी लागेल.



















