सोलापूर : राज्यात अडीच वर्षानंतर महाविकास आघाडीचे सरकार पडले. आणि बंडखोर सेना आणि भाजपची सत्ता आली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे चेहरे पडल्या सारखे झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंढरपूर दौऱ्यावर आले असता राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असलेले महेश कोठे यांनी आपल्या समर्थक नगरसेवकांसोबत भेट घेतली. यावेळी माजी विरोधी पक्ष नेते अमोल शिंदे, माजी नगरसेवक मनोज शेजवाळ, यांच्यासह कोठे यांचे चिरंजीव प्रथमेश कोठे हे उपस्थित होते.
कोठे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने आता ते शिंदे गटात जाणार अशी चर्चा झाली मात्र कोठे यांनी स्पष्टीकरण देऊन आपण राष्ट्रवादीत थांबणार असल्याचं सांगून विषयाला पूर्णविराम दिला. महेश कोठे यांच्या भेटीनंतर सोलापुरातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चलबिचल सुरू झाली. दरम्यान कोठे यांनी शरद पवार, अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या भेटी घेतल्या आहेत.
याच पार्श्वभूमीवर सोलापुरात शहराचे निरीक्षक शेखर माने यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. याबैठकीला शहर निरीक्षक शेखर माने, शहराध्यक्ष भारत जाधव, महेश कोठे, संतोष पवार, दिलीप कोल्हे, सुधीर खरटमल, सुनीता रोटे, शफी इनामदार, जनार्दन कारमपुरी, शंकर पाटील, नलिनी चंदेले, नाना काळे, सरफराज शेख, सर्व सेलचे पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीत राज्यातील सत्ता गेल्याने कोणाच्याही चेहऱ्यावर आनंद नव्हता. सर्वांचे चेहरे पडल्यासारखे होते. एक जण ही उत्साही दिसून आला नाही. बैठकीला गर्दी कमी होती. यावेळी बोलताना महेश कोठे यांनी एकनाथ शिंदे यांच्या भेटी मागील स्पष्टीकरण दिले. मोठ्या पक्षात अनेक येतात जातात परंतु शेवटी हा पक्ष माझा आहे. पक्षावर प्रेम असेल तर त्यांनी पक्ष वाढीसाठी प्रयत्न केला पाहिजे. माझ्यासारखे आयाराम गयाराम किती येतील जातील परंतु पक्ष संपणार नाही, शरद पवार यांच्या विचारांचा पक्ष आहे असे म्हणून सगळ्यांना कामाला लागण्याच्या सूचना कोठे यांनी केल्या.
यावेळी मार्गदर्शन करताना शेखर माने म्हणाले, अडीच वर्षानंतर राज्यात सत्तांतर झालं, सरकार गेले म्हणून नाराज होऊ नका हे सरकार जास्त दिवस टिकणारे नाही. पुन्हा राज्यांमध्ये तीन पक्षाचे सरकार येणार आहे. महेश कोठे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घेतलेली भेट हा विषय पक्षाने गांभीर्याने घेतला नाही, त्याला तेवढे महत्त्व दिले नाही. आपल्याला सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आणायची आहे ते ध्येय समोर ठेवून सर्वांनी काम करा अशी भूमिका माने यांनी मांडली.