सोलापूर : सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा बार्शी तालुक्याचे ज्येष्ठ नेते दिलीप सोपल हे बऱ्याच दिवसानंतर सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये आले होते त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष काका साठे यांच्या सोबत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांची यांच्या कार्यालयात भेट घेतली.
कोहिनकर आज रिलॅक्स होते त्यांच्या टेबलवर एक ही फाईल नव्हती. हे चित्र पाहून सोपल यांनी कोहिनकर तुमचा टेबल क्लीन आहे, नो पेंडसी. त्यावर कोहिनकर यांनी माझा टेबल क्लीन आहे, मात्र खाली पेंडिंग असू शकते असे म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
यावेळेस सोपल यांनी विमानसेवा कधी सुरू होणार? असा प्रश्न पत्रकारांना केला. सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी पाडण्यात आली त्यावरही त्यांनी नकळत नाराजी व्यक्त केली. यापूर्वी पंतप्रधानांचे विमान आले, सुशीलकुमार शिंदे यांचा अमृत महोत्सव असताना राष्ट्रपतींचे विमान आले, अनेक विमाने आले तेव्हा चिमणी दिसली नाही का? असा प्रश्न त्यांनी केला. विलासराव देशमुख यांचे निधन झाले तेव्हा देशातून अनेक विमाने सोलापुरात उतरली होती असेही ते म्हणाले.
दरम्यान बाहेर पत्रकारांनी त्यांना राजकीय विषयावर छेडले असता मी सध्या निष्पक्ष असल्याचा निर्वाळा त्यांनी दिला. शरद पवारांबद्दल विचारले असता त्यांनी आपल्या छातीवर हात ठेवून साहेब इथून कुठेच जाणार नाहीत. “श म्हणजे शरद पवार आणि श म्हणजे शिवसेना पण होते” असे म्हणून ते जिल्हा परिषदेतून बाहेर पडले.


















