मोहोळ तालुक्यातील कुरुल जिल्हा परिषद गटाच्या सदस्य शैला गोडसे यांनी सोमवारी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांची भेट घेऊन निवेदन दिले. त्यांच्यासोबत अनेक नागरिक आपल्या इतर समस्या घेऊन जिल्हा परिषदेमध्ये आले होते.
मौजे कोरवली येथील उपकेंद्र इमारतीच्या निकृष्ट बांधकामाची चौकशी व्हावी तसेच नव्याने इमारतीस परवानगी मिळावी त्याचबरोबर मोहोळ तालुक्यातील मौजे इंचगाव येथील स्मशानभूमीसाठी त्वरित भूसंपादन व्हावे अशा दोन मागण्या शैला गोडसे यांच्या आहेत.
यापैकी कोरवलीच्या मागणीसाठी गेल्या दोन वर्षापासून त्या पाठपुरावा करत आहेत, वारंवार याप्रकरणी निवेदने दिली सर्वसाधारण सभेमध्ये विषय मांडला परंतु कोणतीही कार्यवाही झाली नाही तसेच इंचगाव येथील स्मशानभूमीसाठी भूसंपादन हा विषय मागील पाच वर्षापासून पाठपुरावा करते आहे तो सुद्धा प्रश्न मार्गी लागला नाही. या प्रमुख दोन मागण्यांचा विचार व्हावा अन्यथा येत्या दोन सप्टेंबर रोजी कोरवली आणि चिंचगाव येथील ग्रामस्थांसह आपल्या कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करेल असा इशारा जिल्हा परिषद प्रशासनाला सदस्य शैला गोडसे यांनी दिला आहे.



















