सोलापूर – ( प्रतिनिधी ) – गाईच्या दुधाला ४० व म्हशीच्या दुधाला ६० रुपये भाववाढ मिळावी तसेच दुधाचे धोरण सरकारने ठरवावे,शेतकऱ्यांचा निर्णय घेऊनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आषाढीच्या पूजेला यावे,अन्यथा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून विधान भवनावर मोर्चा काढण्याचा इशारा शिवसेनेचे प्रवक्ते लक्ष्मण हाके यांनी गुरुवारी शासकीय विश्रामगृह येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिला.
महाराष्ट्रामध्ये दुध व्यवसाय हा शेतीचा जोडधंदा म्हणून नावारुपाला येत असतांना, लंम्पी रोग आणि कोरोना-१९ महामारी लॉकडॉऊन नंतर दुध व्यवसाय उभारी घेत असतांना महाराष्ट्रातील दुध संघानी दुधाचे दर अचानक कमी केले. एका बाजुला पशुखाद्य, पशु वैद्यकीय सेवा, यांचे दर दुप्पट होत असतांना आणि प्रतिलिटर दुधाचा भाव वाढण्याऐवजी दुध संघानी कमी का केला ? याचे उत्तर राज्य शासनाने आणि दुध संघानी शेतकऱ्यांना देणे आवश्यक आहे. दुधाची मागणी वाढलेली असतांना दुधाचे दर कमी करुन दुधसंघ नफेखोरी करत आहेत का ? हा प्रश्न महाराष्ट्रातील जनतेला पडलेला आहे. ही मागणी गाईच्या दुधाला ४० व म्हशीच्या दुधाला ६० रुपये भाव वाढ देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
दुधाला एफआरपी कायदा लागु करण्यात यावा, महाराष्ट्र सरकारने कर्नाटकच्या “नंदिनी ” आणि गुजतरात च्या “अमुल ” ब्रॅन्डच्या धरतीवरती महाराष्ट्र शासनाने एक ब्रॅन्ड निर्माण करावा आणि “ना नफा ना तोटा” या धरतीवर दुग्ध व्यवसाय वाढीचा धोरणात्मक निर्णय घेण्यात यावा अशा मागण्या शिवसेनेच्यावतीने करण्यात आल्या .
प्रत्येक जिल्हयाच्या ठिकाणी शिवसेनेच्यावतीने दुधदर वाढीसाठी आंदोलन करण्यात येणार आहे. पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशान्वये जर दुध दर वाढ मागणी मान्य झाली नाही तर प्रत्येक जिल्हयाच्या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने दुध दर वाढीसाठी आंदोलन करण्यात येणार आहे.
पत्रकार परिषदेला जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे, धनंजय डिकोळे, संभाजी शिंदे, गणेश वानकर, अमर पाटील, यांच्यासह अतुल भंवर, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख बालाजी चौगुले, विक्रांत काकडे, पुजा खंदारे, संतोष केंगनाळकर, मोहसीन शेख, माणिक श्रीरामे, नारायण गोवे, तुकाराम भोजने, अशोक भोसले आदी उपस्थित होते.


















