सोलापूर | महाविकास आघाडीचे नेते दिलीप माने यांचे चिरंजीव पृथ्वीराज माने यांचा रविवारी वाढदिवस होता, कोरोनाचा वाईट काळ असल्याने जाहिरात बाजी न करण्यास पृथ्वीराज यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले होते, ती सूचना सर्वांनी पाळली. दरम्यान वाढदिवस सत्काराला येणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी माने कुटुंबीयांनी उत्तर तालुक्यातील कार्यकर्त्यांना एक वृक्ष वाटपाचे नियोजन केले होते, ब्रह्मदेवदादा माने बँकेच्या सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन केले होते, या कार्यक्रमाला नगरसेवक राजकुमार हंचाटे यांची आवर्जून उपस्थिती होती.
यावेळी भाषण करताना हंचाटे यांनी दिलीप मालकांच्या कार्याचं कौतुक केलं, त्याचबरोबर पृथ्वीराज भैय्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या यावेळी मात्र त्यांनी मालकांना तुम्ही सोलापूर शहराचे नेतृत्व करा, पृथ्वीराज भैय्या यांना तालुक्यात पाठवा, तुमचं नाव विधान परिषदेसाठी येत आहे, तुमचा शहरात मोठा संपर्क आहे, जिल्ह्यात ताकद आहे. अशी भावना व्यक्त करताना हांचाटे यांनी पक्ष कोणता ते सांगितले नाही. मात्र महाविकास आघाडीचा उल्लेख नक्की केला.
अजूनही जय महाराष्ट्र म्हणत असलेले दिलीप माने यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना आपल्या घरी बोलावून पाहुणचार केला, तेव्हापासून त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस कडून आगामी विधान परिषदेचे उमेदवार म्हणून चर्चा होऊ लागली आहे.
2019 विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून महेश कोठे यांनी पूर्ण तयारी केली होती त्यांच्यासोबत राजकुमार हंचाटे यांच्यासह शिवसेनेचे सर्व नगरसेवक पाठीशी होते मात्र राजकीय समीकरणे बदलली आणि काँग्रेसचे दिलीप माने शिवसेनेत गेले त्यांनी लगेच शहर मध्य साठी तिकीट आणलं, तरीही शिवसेनेचे अनेक नगरसेवक बंडखोरी केलेल्या महेश कोठेंच्या मागे राहिले, मात्र हंचाटे आणि बडुरवाले हे दोन नगरसेवक दिलीप माने यांच्याकडे येऊन त्यांचा प्रचार केला, आणि माने मालकांचे होऊन गेले, तेव्हापासून हांचाटे हे महेश कोठे यांच्या निशाण्यावर आहेत.


















