सोलापूर : एक सहशिक्षक एकाच दिवशी कोर्ट केस साठी न्यायालयात हजर आणि त्याच दिवशी प्रशालेमध्येही हजर दाखवून शासनाची आर्थिक फसवणूक केल्याची बाब उघडकीस आली आहे. याप्रकरणी माध्यमिक शिक्षणाधिकारी जावेद शेख यांनी संबंधित मुख्याध्यापकाकडून खुलासा मागवला आहे.
मकरंद चंद्रशेखर अंकलगी असे त्या शिक्षकाचे नाव असून ते शिक्षक सांगोला विद्या मंदिर व ज्युनिअर कॉलेज सांगोला या ठिकाणी सेवेत आहेत. याप्रकरणी वाढेगाव येथील प्रशांत घोंगडे यांनी तक्रार केली होती.
माध्यमिक शिक्षणाधिकारी शेख यांनी मुख्याध्यापकांना दिलेल्या पत्रामध्ये म्हटले आहे की, आपल्या प्रशालेतील सहशिक्षक मकरंद चंद्रशेखर अंकलगी यांनी दि. १७.०१.२०२२ हजेरीपत्रकावर स्वाक्षरी करुन न्यायालयात हजर राहुन त्यादिवसाचे वेतन घेवून शासनाची आर्थिक फसवणूक केलेबाबत तक्रारीमध्ये नमुद आहे.
संदर्भ क्रमांक २ अन्वये आपले पत्रात विस्तार अधिकारी यांनी संबंधित कर्मचारी म.चं. अंकलगी हे दिनांक १७.०१.२०२२ रोजी प्रशालेत हजर असलेचा अहवाल दिलेचे निदर्शनास येत आहे.
तथापी संदर्भ क्रमांक ३ अन्वये सदर कर्मचारी न्यायालयात उपस्थित असलेचे दिसुन येत आहे. या अर्थी प्रथमदर्शनी संदर्भीय पुराव्यानुसार अंकलगी हे एकाच दिवशी दोन ठिकाणी कसे काय उपस्थित राहु शकतात सदर कर्मचारी न्यायालयात उपस्थित असताना आपल्या प्रशालेत उपस्थित आहेत असा अहवाल गटशिक्षणाधिकारी यांचेकडे सादर करण्याचे प्रयोजन काय आहे? याबाबत आपण खुलासा करावा.
तेव्हा सदर बाबत आपले स्तरावरुन संबंधित कर्मचारी यांचेवर महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली 1981 मधील नियमान्वये योग्य ती शिस्तभंगविषयक कार्यवाही करावी. तसेच केलेल्या कार्यवाहीचा अहवालसह सदर प्रकरणबाबत वस्तुनिष्ठ खुलासा सादर करावा.




















