सोलापूर : जसजशी लोकसभा निवडणूक जवळ येत आहे, तसं तसे सोलापूरात भारतीय जनता पार्टीला गळती लागत असून, नुकतेच माजी शहर अध्यक्ष अशोक निंबर्गी हे कॉंग्रेस पक्षात गेल्याने भाजपमधील अंतर्गत नाराजी चव्हाट्यावर आली. आता माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांनी देखील तातडीची बैठक बोलावून पक्षात सुरू असलेल्या घुसमटीवर कोणता निर्णय घ्यायचा याची विचारणा करणार असल्याचे कळतंय.
माजी सभागृह नेते सुरेश पाटील भाजपचे जुने निष्ठावंत कार्यकर्ते असून गेले 25 वर्ष भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक, स्थायी समिती सभापती, विरोधी पक्षनेते अशी महत्वाच्या पदावर काम केल्याने एक मोठा जनसमुदाय त्यांच्या पाठीशी आहे. 2014 साली विधानसभा निवडणूकित शहर उत्तर मतदारसंघात सुरेश पाटलांनी भाजपकडे उमेदवारी मागितली होती व मोठे शक्तिप्रदर्शन करत त्यांनी वेळोवेळी त्यांची ताकद दाखवून दिली होती व त्यानंतर त्यांच्यावर विषबाधा करून त्यांना संपविण्याचे देखील कारस्थान करण्यात आल्याचं पहायला मिळालं. मात्र यासर्वातून बाहेर येऊन त्यांनी पुन्हा जनसेवा सुरू करत नेहमी चर्चेत राहिले.
मंगळवारी सुरेश पाटील यांनी तळे हिप्परगा रेस्ट हाऊस जवळ आपल्या भागातील समर्थक कार्यकर्त्यांची मोठी बैठक घेतली. माध्यमांशी बोलताना आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. भाजपचे कार्यकर्ते बिजू अण्णा प्रधाने तसेच माजी शहराध्यक्ष अशोक निम्बर्गी यांनी भारतीय जनता पार्टी का सोडली? याच आत्मचिंतन पक्षाने करावं, जाणीवपूर्वक ज्येष्ठ कार्यकर्त्यांना डावलले जात आहे. यापूर्वी भारतीय जनता पार्टीत असे कधीच घडले नाही या शब्दात पाटील यांनी आपले मन मोकळे केले, दरम्यान सुरेश पाटील कोणता निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. दरम्यान सुरेश पाटील काय म्हणाले पहा हा व्हिडिओ….



















