सोलापूर : अक्कलकोट तालुक्यातील वागदरी गावात कारहुनवी सणानिमित्त काढण्यात आलेल्या बैलगाडी शर्यतीवेळी बैलाने गाडीला दिलेल्या धडकेमुळे गाडी उलटून त्यात साठ वर्षाचे वृद्ध गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. सिव्हील हॉस्पिटलने दोन तास ताटकळत ठेवल्यामुळे जखमी वृद्धाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. साहेबलाल मुल्ला असे त्या जखमी वृद्धाचे नाव आहे.
कारहुनवी सणानिमित्त वागदरी गावामध्ये बैलांना सजवण्यात येऊन त्यांचे शर्यत लावण्यात आली होती. त्यावेळी एका बैलाने बैलगाडीला जोराची धडक दिली तेव्हा त्या बैलगाडीतील वृद्ध मुल्ला हे जोरात डोक्यावर पडले त्यात ते गंभीर जखमी झाले. सहाच्या सुमारास त्यांना सोलापुरातील सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणले होते परंतु सिव्हील हॉस्पिटलने ऑक्सिजन बेड नसल्याचे कारण सांगून दोन तास ताटकळत ठेवले.
त्यामुळे प्रकृती अजूनच चिंताजनक झाली. शेवटी नातेवाईकांनी सोलापुरातील एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू केले, अजूनही त्या वृद्धाची प्रकृती चिंताजनक आहे. या प्रकरणाची माहिती अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांना मिळाल्यानंतर त्यांनी सिव्हिल हॉस्पिटलच्या ढिसाळ कारभाराबाबत तीव्र अशी नाराजी व्यक्त केली आहे.
शासनाकडून सिव्हिल हॉस्पिटलला मोठ्या प्रमाणात सुविधा मिळतात, निधी मिळतो, तो जातो कुठे? असा प्रश्न उपस्थित होतो. आमदार कल्याणशेट्टी यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून सिव्हीलच्या ढिसाळ कारभाराबाबत ते अधिवेशनात प्रश्न उपस्थित करण्याची शक्यता आहे.



















