सोलापूर जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा 25 ऑक्टोबर रोजी घेण्यात आली. चार प्रमुख विषयांसह आयत्या वेळचे अनेक विषय हसतखेळत मंजूर झाले, अनेक ठराव झाले, काही अभिनंदनाचे तर काही निषेधाचे सुध्दा. मात्र आठवणीत राहिला तो पंढरपूर तालुक्यातील ज्येष्ठ सदस्य वसंतराव देशमुख यांनी मांडलेला ठराव आणि सभागृहासमोर ठेवलेला प्रस्ताव .
त्यांची जिल्ह्यातील आशा सेविकांबाबत तळमळ दिसून आली. ते म्हणाले, कोरोना सारख्या जागतिक महामारीमध्ये सर्वात पुढे होऊन, जीवाची पर्वा न करता काम करणारा घटक होता तो एकमेव आरोग्य विभागातील आशा सेविका. याच आशा सेविका सर्वाधिक कोरोना संसर्गित झाल्या, मात्र त्यांनी जिद्द हारली नाही त्या पुन्हा त्याच ताकदीने फिल्डवर तैनात झाल्या. मात्र या आशा सेविकांना शासन तुटपुंजे मानधन देते, आपला कार्यकाळ जवळपास संपत आला आहे, आता दिवाळीचा सण आहे, जर आपण या आशा सेविकांना फुल नाही तर फुलाची पाकळी म्हणूनया बहिणींना भाऊबीजेची भेट देऊ. त्यांची दिवाळी गोड करू, प्रत्येक सदस्यांनी आपल्या मानधनातील 3 हजार रुपये द्यावे असा प्रस्ताव त्यांनी सभागृहासमोर ठेवला,
डायसवर बसलेले सभापती अनिल मोटे यांनी लगेच माझे महिन्याचे मानधन घ्या असे सांगितले त्यानंतर लगेच ज्येष्ठ सदस्य सुभाष माने सर माझे ही घ्या असे म्हणाले, त्रिभुवन धाइंजे यांनी ही होकार दिला अनेकांना हे पटले, काहींनी तर जिल्हा परिषदेचे जितके अधिकारी व कर्मचारी आहेत त्यांनी एक दिवसाचा पगार देण्याची मागणी केली, तो सभागृहात ठराव संमत झाला. आता जिल्हा परिषद प्रशासन या निर्णयाची किती लवकर अंमलबजावणी करतंय याकडे लक्ष लागले आहे.


















