सोलापूर- सोलापुरातील असंख्य वक्फ मालमत्तेवर जाणीवपूर्वक बागेचे टाकलेले आरक्षण त्वरित बदलावे,वक्फ मालमत्तेवरील शासन व महानगरपालिकेचे नावे कमी करून वक्फ संस्थेचे नाव ७/१२ उताऱ्यावर लावावे, वक्फ मालमत्तेवरील अतिक्रमण हटवावे, न्यायिक प्रकरणांचा त्वरित निपटारा करण्याच्या हेतूने विभागवार न्यायासने सुरू करावीत, वक्फ जमिनीची नव्याने मोजमाप व माहिती घेऊन जिल्हावार यादी प्रसिध्द करावी, वक्फ बोर्डास प्रत्येक वर्षी शंभर कोटीचा निधी द्यावा, वक्फ बोर्डाकडून वसतिगृह, दवाखाने, शाळा सुरु करण्यासाठी निधी द्यावा,वक्फ मालमत्तेसाठी मनपा टॅक्स व वीज बिलात सवलत द्यावी,
वक्फ बोर्डाच्या विभागीय कार्यालयास योग्य सोयी व पुरेसे कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी, शासनाने व इतर कार्यालयाने घेतलेल्या वक्फ जमीनींचा मोबदला प्रचलित दराने द्यावा अशा अनेक मागण्यांचे निवेदन आज वक्फ बोर्डाचे कार्यकारी अधिकारी मा.अनिस शेख यांच्याकडे सोलापूर येथील शासकीय विश्रामगृहात सादर करण्यात आले.
यावेळी जमियात उलमा-ए-हिंदचे जिल्हाध्यक्ष मौलाना ईब्राहिम कासमी, जिल्हा सरचिटणीस हसीब नदाफ,हाजी अय्युबभाई मंगलगिरी,हाजी एम.डी.शेख, हाफिज युसुफ,रफीक ईनामदार, जमील खान,शुकूर खलिफा,हाफिज शफीक आदि उपस्थित होते. सदर निवेदनाचा पाठपुरावा अल्पसंख्यांक मंत्रालयाकडे व शासनाकडे करावा अशी विनंती यावेळी मौलाना ईब्राहिम कासमी यांनी कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली.शासनाकडे सदर मागण्याबाबत पाठपुरावा करण्याचे आश्वासन यावेळी अनिस शेख यांनी दिले..
















