मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट निर्देश दिले की,एकीकडे आपण कोविड परिस्थितीतही अर्थव्यवस्था सुरु राहील याचा आटोकाट प्रयत्न करतोय मात्र अनेक घटक अजूनही ही गोष्ट गांभीर्याने घेत नाहीत. अजूनही खासगी कार्यालयातून उपस्थिती नियमांचे पालन होत नाही,विवाह समारंभ नियम तोडून सुरु आहेत, तसेच बाजारपेठांमध्ये देखील सुरक्षित अंतर, मास्क याचे पालन होताना दिसत नाही. शेवटी लोकांच्या आरोग्याचे संरक्षण करणे याला आमचे प्राधान्य आहे.
त्यामुळे अतिशय कठोरपणे नियमांचे पालन करावे अन्यथा लॉकडाऊन करावं लागेल असे समजून धान्य पुरवठा, औषधी, अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय सुविधा यांचे नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी मुख्य सचिवांना दिले.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयातील तसेच शासकीय व निमशासकीय कार्यालयांतील अभ्यागतांना पूर्ण प्रवेशबंदी घालावी तसेच खासगी कार्यालये व आस्थापना ५० टक्के कर्मचारी संख्येचे निर्बंध पाळत नसतील तर लॉकडाऊनची तयारी करावी अशा स्पष्ट सूचना बैठकीत दिल्या.
राज्यातील नागपूर, औरंगाबाद, नांदेड, बीड, अमरावती या जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 2 एप्रिलनंतर राज्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन लॉकडाऊनचा निर्णय घेतील., अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.



















