सोलापूर : यंदाच्या वर्षी श्री गणेश उत्सव विसर्जन आणि मुस्लिम बांधवांचा ईद-ए-मिलाद हा सण एकाच दिवशी आला. परंतु या दोन्ही सणाच्या मुळे पोलीस प्रशासनावर ताण येत असल्याने प्रशासनाने मुस्लिम बांधवांना केलेल्या आवाहनानुसार महाराष्ट्रातील मुस्लिम समाजाने ईद-ए-मिलाद हा सण 28 सप्टेंबर ऐवजी दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी 29 सप्टेंबर रोजी साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी शासकीय सुट्टी जाहीर केली. त्यामुळे अनंत चतुर्दशी दिवशीची सुट्टी रद्द करण्यात आली आहे त्यामुळे शासकीय कामकाज सुरू राहणार आहे.
याप्रकरणी जिल्हा प्रशासनाकडून सुद्धा 28 सप्टेंबर गुरुवारी सोलापुरातील सर्व शासकीय कामकाज सुरू राहणार आहे असे सांगितले आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी जिल्हा परिषदेचे कामकाज गुरुवारी सुरू राहील परंतु शाळेला सुट्टी असल्याने शिक्षण आस्थापना बंद राहील असे परिपत्रक काढले आहे.